लिंगायत समाजाच्या आरक्षणाबाबत सकारात्मक
By admin | Published: July 10, 2014 12:32 AM2014-07-10T00:32:32+5:302014-07-10T00:36:10+5:30
कऱ्हाड : शिष्टमंडळाची पृथ्वीराज चव्हाणांशी चर्चा
कऱ्हाड : ‘वीरशैव लिंगायत समाजाच्या आरक्षणाबाबत यापूर्वीही प्रतिनिधी मला भेटले आहेत. आझाद मैदानावर केलेले आंदोलन मला माहिती आहे. मी अथवा राज्य शासन तुमच्या समाजाच्या आरक्षणाबाबत सकारात्मकच आहोत. तुम्हाला अल्पसंख्यांक दर्जा मिळावा, यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठविणार आहे,’ अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी समाजाच्या शिष्टमंडळाला दिली. येथील शासकीय विश्रामगृहात वीरशैव लिंगायत समाजाचे शिष्टमंडळ आरक्षणाचा मुद्दा घेऊन मुख्यमंत्री चव्हाण यांना भेटले. काशी पिठाचे जगद्गुरू चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांच्या वतीने तयार करण्यात आलेले निवेदन नीळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार बटाणे, विनायक विभूते, आर. टी. स्वामी, अॅड. सदानंद चिंगळ आदी उपस्थित होते. त्यानंतर लगेचच लिंगायत धर्म महासभेच्या वतीनेही मुख्यमंत्री चव्हाण यांना याबाबतचे दुसरे निवेदन देण्यात आले. यावेळी वीरशैव बँकेचे चेअरमन सुनील रुकारी, बी. एस. पाटील, सरला पाटील, चंद्रशेखर विभूते यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या दोघांचेही मत ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्री चव्हाण यांनी सर्वांनाच सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी लिंगायत धर्म महासभेच्या कार्यकर्त्यांनी आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणा दिल्या. (प्रतिनिधी) शाब्दिक चकमक नीळकंठ शिवाचार्य धारेश्वरकर महाराज यांनी आपल्या शिष्यांसोबत प्रथमत: मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले तर त्यानंतर लिंगायत धर्म महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी दुसरे निवेदन दिले. वीरशैव लिंगायत की फक्त लिंगायत, असा प्रश्न खुद्द मुख्यमंत्र्यांनाच पडला. त्यानंतर शासकीय विश्रामगृहातून बाहेर पडताना लिंगायत धर्म महासभेचे पदाधिकारी व धारेश्वरकर महाराज यांच्यात शाब्दिक चकमक झाली. संपर्कमंत्र्यांकडून जिल्ह्याचा आढावा गृहराज्यमंत्री आणि सातारा जिल्हा काँग्रेसचे संपर्कमंत्री सतेज पाटील यांचे आगमन सकाळी मुख्यमंत्र्यांसोबतच विमानतळावर झाले. आनंदराव चव्हाण व प्रेमलाताई चव्हाण यांना आदरांजली वाहिल्यानंतर दिवसभर सतेज पाटील हे मुख्यमंत्र्यांसोबतच राहिले. सायंकाळी साडेचार वाजता मुख्यमंत्री चव्हाण हे पत्नी सत्त्वशीला यांच्यासमवेत हेलिकॉप्टरने पंढरपूरकडे रवाना झाले आणि सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांना विमानतळ विश्रामगृहात एकत्र बोलावून जिल्ह्याच्या कामाचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन., पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित बांगर यांच्याशी सुमारे अर्धा तास त्यांनी चर्चा केली. यावेळी आमदार आनंदराव पाटील यांचीही उपस्थिती होती.