सकारात्मक विचार समाजहितैषी
By admin | Published: December 23, 2014 09:33 PM2014-12-23T21:33:29+5:302014-12-23T23:48:08+5:30
प्रल्हाद पै : ओघवत्या शब्दांनी श्रोते झाले मंत्रमुग्ध-- लोकमत माध्यम प्रायोजक
सातारा : ‘चांगले विचारच समाजाला बदलू शकतात. त्यामुळे मनात येणाऱ्या विचारांचा विचार करत राहा. वाईट विचार बाजूला सारुन चांगले विचार आत्मसात करा. हे विचारच प्रत्येकासाठी पोषक असून त्याबाबत प्रत्येकाने सावध असले पाहिजे,’ असे विचार प्रल्हाद पै यांनी येथे व्यक्त केले.
जीवन विद्या मिशन शाखा, सातारा व सु-स्वराज्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात पै यांच्या व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला ‘लोकमत’ माध्यम प्रायोजक होते. प्रल्हाद पै यांनी ‘व्यवस्थापन जीवनाचे’ व ‘उत्कर्ष एक प्रवास’ या व्याख्यानांच्या माध्यमातून श्रवणीय शब्दांत उपस्थित श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेतला.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, संयोजक चंद्रशेखर चोरगे, उद्योजक श्रीराम दीक्षित, पंकज गांधी, संजय चंदूरकर, राजेश कोरपे, शिरीष खुटाळे, सचिन कलाणी, श्रीकांत पवार, युवराज पवार, भरत शेठ, सारंग खिरे, अलोक गांधी, शैलेश दिडवई, डॉ. अच्युत गोडबोले यांच्यासह राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, व्यापारी क्षेत्रातील असंख्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
प्रल्हाद पै म्हणाले, ‘जीवनविद्येच्या शिकवणुकीमुळे कायिक, आर्थिक, मानसिक व वाचिक संपत्ती वाढल्याची उदाहरण जागोजागी पाहायला मिळतात. लहान मुलांना या शिकवणुकीची मोठी गरज आहे. या शिकवणुकीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या. मन परिवर्तन करण्याचे सामर्थ्य या शिकवणुकीत आहे. अंधश्रध्दा निर्मूलन, व्यसनमुक्ती आणि भ्रष्टाचाराविरोधात लढण्याचं सामर्थ्य या शिकवणुकीत आहे.’
यानंतर दुसऱ्या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत पै म्हणाले, ‘आम्ही धर्माचा प्रचार करत नाही, आम्ही सत्कर्मावर श्रद्धा ठेवा, असे सांगतो. आता देशातील सुमारे ४२ कोटी तरुणांसाठी चांगले काम करण्याचा प्रयत्न सुरू आहे,’ अशी माहिती प्रल्हाद वामनराव पै यांनी दिली.
प्रल्हाद पै म्हणाले, ‘आमच्याकडे येणाऱ्या लोकांत सुधारणा होत आहे. आम्ही ज्ञानातून लोकांच्यात बदल करत आहोत. (प्रतिनिधी)
चोरगे परिवारातर्फे कारचे वितरण
जीवन विद्या मिशनचे साताऱ्यातील नामधारक व या कार्यक्रमाचे संयोजक चंद्रशेखर चोरगे व त्यांच्या परिवाराने वामनराव पै यांच्या विचारांच्या प्रचार व प्रसार करण्याच्या हेतूने सातारा जिल्ह्यासाठी ओमनी गाडी भेट दिली. यापूर्वीही त्यांनी मिशनच्या कार्यासाठी मोठी गाडी भेट दिली होती.