अदालतवाड्यातून पिस्टल चोरणारा अल्पवयीन ताब्यात
By admin | Published: February 3, 2015 10:58 PM2015-02-03T22:58:02+5:302015-02-03T23:53:59+5:30
एलसीबीची कारवाई : तीन जिवंत काडतुसेही हस्तगत
सातारा : अदालतवाड्यातून चोरीला गेलेली पिस्टल शोधून काढण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. याप्रकरणी मंगळवारी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसेही पोलिसांनी हस्तगत केली.याबाबतची अधिक माहिती अशी की, येथील अदालतवाड्यातून शिवाजीराजे भोसले यांची अडीच लाख रुपयांची २२ बोअरची ‘मेड इन स्पेन’ची पिस्टल चोरीला गेली होती. या अनुषंगाने त्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. ही पिस्टल माची पेठ येथीलच एका अल्पवयीन मुलाने चोरून नेल्याची माहितीस्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळाली. पोलिसांनी संबंधित अल्पवयीन मुलास ताब्यात घेतल्यानंतर त्यांने ही पिस्टल त्याच्या घरामध्ये असणाऱ्या लोखंडी बॅरेलमध्ये ठेवल्याचे सांगितले. त्याच्याकडून पोलिसांनी पिस्टल आणि तीन जीवंत काडतूसे हस्तगत केली आहेत. संबंधित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अनंत चिंचकर, शामराव मदने, सहायक पोलीस उपनिरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, हवालदार संजय पवार, विजय शिर्के, पोलीस नाईक कांतीलाल नवघणे, विजय कांबळे, शरद बेबले, नितीन भोसले, चालक संजय जाधव सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
‘स्टेटस सिम्बॉल’साठी
स्थानिक गुन्हे शाखेतून मिळालेल्या माहितीनुसार, अदालत वाड्यातील पिस्टल चोरीप्रकरणी ताब्यात घेतलेला अल्पवयीन मुलगा शालेय विद्यार्थी आहे. तो एका खासगी क्लासलाही जातो. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले तेव्हा तो संबंधित क्लासचालकाची दुचाकी घेऊन क्लासचालकाचे काम करण्यासाठी बाहेर गेला होता. पोलिसांनी त्याला विचारणा केल्यानंतर चोरीची कबुली दिली. मात्र, आपण ‘सारे काही स्टेटस सिम्बॉल’साठी केले असल्याचेही त्याने मान्य केल्याचे स्थानिक गुन्हे शाखेतून सांगण्यात आले.