मांढरदेव खूनप्रकरणी संशयित ताब्यात
By admin | Published: November 21, 2014 11:48 PM2014-11-21T23:48:08+5:302014-11-22T00:08:14+5:30
तपशील गोपनीय : इंदापूर तालुक्यातील लाकडी गावातून अटक
वाई/मांढरदेव : मांढरदेव येथील प्रसिद्ध काळूबाई मंदिर परिसरात गुरुवारी झालेल्या अल्पवयीन मुलीच्या निर्घृण खूनप्रकरणी पोलिसांनी चोवीस तासांच्या आत एका संशयितास ताब्यात घेतले आहे. तथापि, तपासाच्या दृष्टीने संशयिताची ओळख आणि तपशील गोपनीय ठेवला आहे.
वाई तालुक्यातील मांढरदेव येथील काळूबाईचे देवस्थान लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिरापासून जवळच काल दुपारी एका अल्पवयीन मुलीचा गळा चिरून निर्घृण खून करण्यात आल्याचे उघड झाले होते. हा नरबळीचा प्रकार असावा का, या शंकेने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. त्यामुळे तातडीने संशयिताचा शोध घेणे पोलिसांच्या दृष्टीने गरजेचे ठरले होते.
पोलिसांनी आज, शुक्रवारी एका संशयितास इंदापूर तालुक्यातील लाकडी गावातून ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान, मृतदेहाची ओळख पटली असून, भारती कादर भोसले असे खून करण्यात आलेल्या मुलीचे नाव आहे. संशयिताकडून लवकरच खुनामागील कारणाचा उलगडा होईल, असे पोलिसांनी सांगितले.
वाई तालुक्यातील सुरूर पोलीस ठाण्यात एक मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली गेली होती. त्या मुलीचे वर्णन आणि गडावरील खून झालेल्या मुलीचे वर्णन जुळत असल्याने त्या दिशेने शोध घेतला गेला. खून झालेली मुलगी तीच असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पुढील हालचालींना वेग आला आणि संशयित पोलिसांच्या जाळ्यात सापडला. (प्रतिनिधी) (आणखी वृत्त हॅलो १)
नरबळीचा प्रकार नाही
मांढरदेव येथे अल्पवयीन मुलीचा झालेला खून हा नरबळीचा किंवा अंधश्रद्धेचा प्रकार नसल्याचे प्राथमिक तपासातून समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. तथापि, खुनामागील कारणाबाबत आणि संशयिताबाबत अधिक तपशील देण्यास त्यांनी तपासातील गोपनीयतेच्या कारणाने नकार दिला.