पोस्टातच मिळेना ‘पोस्ट कार्ड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:41 AM2021-02-11T04:41:10+5:302021-02-11T04:41:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वडूज : आपल्या आप्तेष्टांकडून दर काही दिवसांनी येणारी पिवळी पोस्ट कार्ड लेटर बॉक्समध्ये पडली की आजही ...

Post card not found in post | पोस्टातच मिळेना ‘पोस्ट कार्ड’

पोस्टातच मिळेना ‘पोस्ट कार्ड’

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

वडूज : आपल्या आप्तेष्टांकडून दर काही दिवसांनी येणारी पिवळी पोस्ट कार्ड लेटर बॉक्समध्ये पडली की आजही काही ज्येष्ठ नागरिकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. फेसबुक, व्हॉट्सअप या सगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जमान्यात आजही अनेक नागरिकांचा पोस्ट कार्डावरील विश्वास उडालेला नाही. पण सध्या ही पोस्ट कार्ड शहरातील पोस्ट ऑफिसांमधूनच गायब झाल्याचे चित्र आहे. गेल्या महिनाभरापासून कार्यालयांमध्ये आंतरदेशीय पत्र व पिवळ्या पोस्ट कार्डांचा तुटवडा असून, यासंदर्भात अनेक ज्येष्ठ नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत.

तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज शहरातील कार्यालयांमध्ये आंतरदेशीय पत्र व पोस्ट कार्डांचा तुटवडा सुरू आहे. या कार्यालयांमध्ये विचारणा केली असता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून वेगवेगळी कारणे दिली जात आहेत. कधी मुख्य कार्यालयातून पोस्ट कार्ड उपलब्ध नाहीत, असे सांगितले जाते. तर कधी पोस्ट कार्ड आता परवडत नाहीत, त्यामुळे त्याचा तुटवडा आहे, असेही खासगीमध्ये सांगितले जाते. अशा कारणांमुळे अनेक दिवस नागरिकांना पोस्ट कार्ड मिळत नसून, मिळालीच तर ती हव्या त्या संख्येने उपलब्ध होत नाहीत. आजही अनेक व्यक्ती आणि संस्था त्यांच्या कार्यक्रमांची निमंत्रणे पाठविण्यासाठी पोस्ट कार्डांचा वापर करतात. कार्डांवर निमंत्रणे किंवा विशिष्ट संदेश ज्येष्ठ नागरिकांतर्फे पाठवले जातात. आता मात्र, ही कार्ड मिळतच नसल्याने अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात पोस्टातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनीही याविषयी कोणतीही कल्पना नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. दुसऱ्या एका अधिकाऱ्यांना विचारणा केली तर त्यांनी उद्या माहिती घेऊन सांगतो, अशी उत्तरे दिली. या संदर्भात वारंवार पोस्ट कार्ड घेण्यासाठी म्हणून पोस्टात जाणाऱ्यांनी सांगितले की ‘गेल्या एक महिन्यापासून पोस्ट कार्यालयात फेऱ्या मारल्या; पण पोस्ट कार्डांचा तुटवडा आहे. अधिकाऱ्यांकडून वेगवेगळी उत्तरे दिली जातात. आम्ही सातत्याने पोस्ट कार्डाचा वापर करतो. आजही पोस्ट कार्डाच्या माध्यमातून निमंत्रणे किंवा कार्यक्रमाची माहिती पाठवतो; पण कार्डच मिळत नसल्याने सध्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक दररोज विचारणा करण्यासाठी जातात आणि त्यांच्या पदरी निराशा पडते. हे थांबायला हवे.'

सध्याच्या अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सोशल मीडियामुळे पोस्ट कार्ड आणि पत्र हा शब्दच मागे पडला असला तरी आजही अनेकांनी ही संस्कृती जिवंत ठेवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. पण त्यांना ही कार्डच मिळाली नाहीत, तर लवकरच पोस्टाची पिवळी कार्ड इतिहासजमा होतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

चौकट..

पैसे वाढवा; पण पोस्ट कार्ड द्या!

सध्याचे पोस्ट कार्ड हाताने लिहिलेले असेल तर त्याची किंमत ५० पैसे आहे. त्यावर काही मजकूर छापील स्वरुपात असेल, तर त्याची किंमत सहा रुपये एवढी होते. शक्यतो पोस्ट कार्डावर हातानेच मजकूर लिहिला जातो. या किमतीमध्ये पोस्टाला ही सेवा परवडत नाही, अशी शक्यता आहे. शिवाय त्यांच्याकडे प्रत्येक ठिकाणी पत्रे वितरण करण्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळही कमी आहे. या सगळ्याकडे पाहता. पोस्टाने कार्डाची किंमत वाढवावी; पण ही कार्ड बंद करू नयेत, अशी विनंती नागरिकांनी केली आहे.

10वडूज01/02

( पत्राचा संग्रहित फोटो फीचर वापरणे )

Web Title: Post card not found in post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.