'सातारा'ने भाजपचं नेमकं काय घोडं मारलयं!, कार्यकर्त्यांच्या मनात खदखद

By प्रमोद सुकरे | Published: July 6, 2024 12:04 PM2024-07-06T12:04:56+5:302024-07-06T12:05:12+5:30

प्रमोद सुकरे कराड : एकेकाळी काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला सातारा जिल्हा आता भाजपाचा बालेकिल्ला बनण्याच्या मार्गावर आहे. नुकत्याच झालेल्या ...

post however the BJP has always been disappointed In Satara | 'सातारा'ने भाजपचं नेमकं काय घोडं मारलयं!, कार्यकर्त्यांच्या मनात खदखद

'सातारा'ने भाजपचं नेमकं काय घोडं मारलयं!, कार्यकर्त्यांच्या मनात खदखद

प्रमोद सुकरे

कराड : एकेकाळी काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला सातारा जिल्हा आता भाजपाचा बालेकिल्ला बनण्याच्या मार्गावर आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेले यश आणि त्या अनुषंगाने विधानसभा मतदारसंघात झालेल्या घडामोडी बोलक्या आहेत. हे सगळं खरं असलं तरी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची मात्र सातारा जिल्ह्याकडे वक्रदृष्टी दिसते असे भाजप कार्यकर्तेच दबक्या आवाजात बोलत आहेत. त्याला अनेक कांगोरे आहेत. पण 'सातारा'ने भाजपचं नेमकं काय घोडं मारलयं? असा प्रश्न आता दस्तूर खुद्द भाजपच्याच कार्यकर्त्यांना पडला आहे.

खरंतर भाजपच्या स्थापनेनंतर जिल्ह्यात त्याचे अस्तित्व अत्यंत नगण्य होते. भाजपचा झेंडा खांद्यावर घेऊन रस्त्यावर लढणारी जेमतेम मुंडकी होती. त्यात दिवंगत राजाभाऊ देशपांडे,  गजाभाऊ कुलकर्णी, मधुकर पवार, भाऊसाहेब सूर्यवंशी यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. त्यानंतर माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर,भिकू भोसले, अँड.भरत पाटील यांनी खिंड लढवली. आता मात्र सातार्या बरोबर देशातही भाजपने मुसंडी मारली आहे. पण दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात 'कमळ' फुलवणं, रुजवणं हे काम किती अवघड आहे याची तितकिशी दखल कोणी वरिष्ठ भाजप नेता घेताना दिसत नाही.नाही म्हटलं तरी कार्यकर्त्यांच्या मनात याची सल आहे बरं !

सध्या सातारा जिल्ह्यात भाजपचा एक खासदार आणि दोन आमदार आहेत. उदयनराजे भोसले तर चौथ्यांदा खासदार झालेत. तर यापूर्वी त्यांना एकदा राज्यसभेवर संधी दिली होती. पण केंद्रीय मंत्रिमंडळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना स्थान मिळालेले दिसत नाही. तर राज्याच्या मंत्रिमंडळातही साताराला भाजपने कोणाला संधी दिलेली नाही. ही शोकांतिका म्हणायची का?

राज्याच्या राजकारणात जेव्हा जेव्हा पश्चिम महाराष्ट्राचा म्हणून विचार होतो तेव्हा तेव्हा पुण्याला भाजपने झुकते माप दिलेले दिसते. तर सांगली, कोल्हापूरच्या पदरातही नेहमीच काहीतरी पडत आलेले आहे. पण सातारच्या पदरात मात्र भाजपकडून नेहमीच 'निराशा' पडलेली दिसते.

सध्या विधान परिषदेची निवडणूक सुरू आहे. सातारा जिल्ह्यात भाजपने विधान परिषदेचे गाजर अनेकांना दाखवल्याची चर्चा आहे. पण  संधी तर कोणालाच मिळेलेली दिसत नाही. त्यामुळे भाजप सातारा जिल्ह्यावर अन्याय करत असल्याच्या भावना कार्यकर्त्यांच्या मनात वाढू लागल्या आहेत.

पुण्याला काय मिळाले

सध्या पुण्यातून भाजपच्या मेघा कुलकर्णी  राज्यसभेवर खासदार आहेत. तर लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच निवडून आलेल्या मुरलीधर मोहोळ यांना नुकतेच केंद्रात मंत्री बनवले आहे. उमा खापरे या विधान परिषदेवर विद्यमान आमदार आहेत. आता सध्या सुरू असलेल्या विधानपरिषद निवडणुकीसाठी अमित गोरखे व योगेश टिळेकर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. यापूर्वी भाजपने अमर साबळे व प्रकाश जावडेकर यांना राज्यसभेवर पाठवले होते.

सांगलीला काय मिळाले

यापूर्वी भाजपने जेष्ठ नेते दिवंगत अण्णासाहेब डांगे यांना विधान परिषदेवर ३ वेळा संधी दिली होती. तर त्यांना विरोधी पक्षनेते  आणि मंत्रीपदही दिले होते. सध्या भाजपचे गोपीचंद पडळकर विधान परिषदेचे सदस्य आहेत. आणि आता मित्रपक्षाच्या नावाखाली यापूर्वी सदस्य व मंत्री राहिलेल्या सदाभाऊ खोत यांना पुन्हा एकदा विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे.

कोल्हापूरला काय मिळाले?

यापूर्वी कोल्हापूरला चंद्रकांत दादा पाटील हे विधान परिषदेवर सदस्य होते. ते मंत्रीही होते. सध्या ते पुण्यातून आमदार आहेत आणि राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. कोल्हापूरचे दाबके सर हे विधान परिषदेवर सदस्य होते. तर  धनंजय (मुन्ना )महाडिक हे सध्या राज्यसभेवर खासदार आहेत.

आता तरी सातारला संधी मिळणार का?

अधिवेशनानंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होईल असे बोलले जात आहे. तर राज्यपाल नियुक्त आमदारही लवकरच नियुक्ती होतील अशीही चर्चा आहे. त्यामुळे यात तरी सातारला संधी मिळणार का ?असा प्रश्न सातारा जिल्ह्यातील भाजपवासीयांना पडला आहे.

Web Title: post however the BJP has always been disappointed In Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.