सोशल मीडियावर पोस्ट ठेवताय, पण जरा जपून...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:40 AM2021-05-09T04:40:00+5:302021-05-09T04:40:00+5:30
खंडाळा : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार काही केल्या कमी होताना दिसत नाही. रुग्णांना बेड उपलब्ध करताना नातेवाइकांची कसरत होत ...
खंडाळा : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार काही केल्या कमी होताना दिसत नाही. रुग्णांना बेड उपलब्ध करताना नातेवाइकांची कसरत होत आहे. अनेक रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याची वेळ येत आहे. त्यातच एखादा व्यक्ती गतप्राण झाल्यावर त्यांच्या श्रद्धांजली पोस्ट टाकण्यात नेटकरी अग्रेसर राहतात, पण हीच पोस्ट रुग्णालयातील रुग्णाच्या पाहण्यात आल्यास, तो धक्का रुग्णांना धोकादायक ठरत आहे. तेव्हा नेटकऱ्यांनो सोशल मीडियावर पोस्ट ठेवताना जरा जपूनच ठेवा.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात प्रसाराचा वेग चांगलाच वाढला आहे. प्रतिदिन दोन हजारांपेक्षा अधिक लोक बाधित होत आहेत. ज्या कुटुंबातील व्यक्ती बाधित होत आहेत, त्यांच्यावर मोठी जबाबदारीची वेळ येत आहे. आपल्या रुग्णाला चांगल्या रुग्णालयात उपचार मिळावेत, यासाठी बेड मिळविण्याची धडपड करावी लागत आहे. त्यातच दुसऱ्या लाटेतील कोरोनाचा स्टेन अधिक घातक असल्याचे स्पष्ट होत आहे. मृत्यूचे प्रमाणही वाढल्याचे दिसून येत आहे. रुग्णांना अचानक त्रास वाढणे, श्वसनास त्रास होणे, ऑक्सिजन पातळी घटणे असे प्रकार घडत असल्याने, त्याची भीती बाधितांना मोठ्या प्रमाणात आहे. रुग्णांनी जास्त धसका घेतला, तर तब्बेत सुधारणे आणखी बिकट होत आहे. त्यामुळे आपल्या रुग्णाने धसका घेऊ नये, यासाठी नातेवाईक, वैद्यकीय कर्मचारी काळजी घेत असतात. त्यातच एकाच कुटुंबातील अनेक जण बाधित झाल्यास त्यांना मिळेल त्या रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. त्यांना एकमेकांची काळजी लागून राहते, परंतु अशा वेळी त्या कुटुंबातील, गावातील, पाहुण्यातील कोणी कोरोनाने दगावल्यास त्यांना फेसबुक, व्हॉट्सॲप, स्टेटसवर श्रद्धांजली वाहण्यात अनेक जण अग्रेसर राहतात किंवा कोरोनाविषयी भीतिदायक मजकूर व्हायरल केला जातो. याच पोस्ट रुग्णांनी दवाखान्यात पाहिल्यास त्याचा विपरित परिणाम त्यांच्यावर होत असतो. त्यामुळे नेटकऱ्यांनी सध्याच्या काळात याबाबत समयसूचकता बाळगणे गरजेचे आहे.
चौकट..
हे करू नका -
१ ) कोरोनाची वाढती आकडेवारी शेअर करू नका.
२ ) भीतिदायक मेसेज करू नका.
३ ) कोणत्याही मयत व्यक्तीचा श्रद्धांजली फोटो ठेवू नका.
४ ) औषधोपचार तुटवडा अथवा अन्य मजकूर पसरवू नका.
हे जरूर करा -
१ ) सकारात्मक विचार ठेवा.
२ ) रुग्णांचे मनोबल वाढेल, असे मेसेज करा.
३ ) दररोज कोरोनामुक्त रुग्णांचे आकडे ठेवा.
४ ) उपलब्ध सोयी त्यांच्यापर्यंत पोहोचवा.
(चौकट..)
सकारात्मक विचार करायला हवा...
कोरोनाचे उपचार घेत असलेल्या रुग्णांची औषधोपचाराबरोबरच मानसिक स्थिती प्रबळ राखणे खूप महत्त्वाचे आहे. रुग्णांनी देखील आपण कोरोनाशी लढा देऊन त्यावर यशस्वी मात करू शकतो, असाच विचार ठेवणे गरजेचे आहे. माझे कसे होईल याची चिंता न करता मी चांगला होणारच हा सकारात्मक विचार करायला हवा. रुग्णाची मानसिकता चांगली राहिली तर उपचाराला शरीर साथ देते, त्यामुळे बरे होण्याचे प्रमाण वाढू शकते.
..........................................