पोस्टमार्टेम... क्षमतेचे की अनास्थेचे?

By admin | Published: July 27, 2015 10:59 PM2015-07-27T22:59:22+5:302015-07-27T22:59:22+5:30

‘पीएम येत नाही’ : जिल्हा रुग्णालय-आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट; रंगलाय कलगी-तुरा

Postmortem ... the ability to abstain? | पोस्टमार्टेम... क्षमतेचे की अनास्थेचे?

पोस्टमार्टेम... क्षमतेचे की अनास्थेचे?

Next

सातारा : ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये शवविच्छेदनाची सुविधा असूनही अनेकदा मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येतो, अशी तक्रार जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी केली आहे. तथापि, अशी वेळ अपवादात्मक स्थितीतच येते असे सांगून जिल्हा आरोग्य विभागाने जिल्हा रुग्णालयाकडेच बोट दाखविले आहे. ‘डॉक्टरांना शवविच्छेदन येत नसल्यामुळे मृतदेह साताऱ्याला पाठविला,’ अशा आशयाच्या पोलीस कर्मचाऱ्याच्या टिपणामुळे वादात ठिणगी पडली असून, यामुळे आरोग्य विभागाची क्षमता आणि जिल्हा रुग्णालयाची आस्था यापैकी कशाचे ‘पोस्टमार्टेम’ झाले, असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, मूळच्या निंबूत (ता. बारामती) येथील चौदा वर्षांच्या मुलाला लोणंदच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी आणण्यात आले; परंतु उपचारापूर्वीच या मुलाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात करण्यात आली. पोलिसांकडून लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना मृताचे शवविच्छेदन करण्यासाठी पत्र देण्यात आले. मात्र, शवविच्छेदन सातारच्या जिल्हा रुग्णालयातून करून घ्यावे, अशी चिठ्ठी आरोग्य केंद्राकडून पोलिसांना देण्यात आली. ‘सदर डॉक्टरांनी पीएम येत नसल्यामुळे सातारा सिव्हिल हॉस्पिटल येथे त्यांच्या पत्रानुसार पाठविले आहे,’ अशी नोंद पोलीस हेडकॉन्स्टेबलने जिल्हा रुग्णालयाला दिलेल्या पत्रात केली आहे. मृताच्या नातेवाइकांसोबत कॉन्स्टेबल पाठवून मृतदेह साताऱ्याला आणण्यात आला. लोणंद ते सातारा आणि सातारा ते बारामती असा प्रवास नातेवाइकांना मृतदेहासोबत करावा लागला. गेल्या दोन महिन्यांतच पिंपोडे, वाठार स्टेशन या ठिकाणचे मृतदेह साताऱ्याला पाठविण्यात आले, असे डॉक्टरांनी सांगितले.
जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये शवविच्छेदनाची सुविधा उपलब्ध आहे. त्यासाठी स्वतंत्र कक्ष आणि सामग्री देण्यात आली आहे. आसपासच्या भागातील अनैसर्गिक मृत्यूंच्या घटनांमध्ये शवविच्छेदन करायचे झाल्यास त्या-त्या आरोग्य केंद्रात केले जावे, अशा सूचना आहेत. तसेच, ऐन वेळी डॉक्टर उपलब्ध नसल्यास शेजारील आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालयातून डॉक्टरांना बोलावण्यात यावे, अशाही सूचना आहेत. आरोग्य केंद्रे आणि ग्रामीण रुग्णालयांमधील डॉक्टर प्रशिक्षित असल्यामुळे तसेच वैद्यकीय अभ्यासक्रमातच शवविच्छेदनाचा समावेश असल्यामुळे ते येत नाही, हे कारण न पटणारे आहे, असे जिल्हा रुग्णालयातील सूत्रांचे म्हणणे आहे. ‘शवविच्छेदन येत नसल्यास अशा डॉक्टरांना जिल्हा रुग्णालयात प्रशिक्षणासाठी पाठवा,’ अशी संतप्त प्रतिक्रियाही या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयात उमटली.
तथापि, ज्या संस्थेकडे मृतदेह येईल, त्या संस्थेने शवविच्छेदन केलेच पाहिजे, असा शासकीय आदेश असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. लोणंदच्या घटनेत मृत्यूचे नेमके कारण समजण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे मत महत्त्वाचे होते म्हणूनच मृतदेह सातारला पाठविण्यात आला, असे त्यांनी सांगितले.
बऱ्याच वेळा ग्रामीण रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर उपलब्ध नसतात. नेमणुकीच्या ठिकाणी डॉक्टरांनी वास्तव्यास असले पाहिजे, असे निर्देश असले तरी अनेक डॉक्टर त्या-त्या ठिकाणी राहत नाहीत, हे अनेकदा समोर आले आहे. शिवाय, आकस्मिक मृत्यूच्या घटनेवेळी इतरही कारणांनी डॉक्टर रुग्णालयाबाहेर असण्याची शक्यता असते. त्यामुळे जिल्हा रुग्णालयावरील ताण वाढतोच; शिवाय मन:स्थिती चांगली नसताना मृताच्या नातेवाइकांना दूरवरून साताऱ्याला येण्या-जाण्याचा त्रास सहन करावा लागतो, असे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचे म्हणणे आहे. अशातच प्रशिक्षित डॉक्टरांनी शवविच्छेदन करण्यास असमर्थता दर्शविल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या; मात्र ग्रामीण रुग्णालये आणि आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांनी वेळप्रसंगी घटनास्थळी जाऊन उघड्यावर शवविच्छेदन केले आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी छातीठोकपणे सांगतात.
एकंदरीत शवविच्छेदन कोणत्या परिस्थितीत कोणी करायचे, या वादात मृताच्या नातेवाइकांना दु:खाच्या क्षणी होणारी यातायात दुर्लक्षित होऊ नये, असे मत व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)

सहा महिन्यांपूर्वी धाडलंय पत्र
अनैसर्गिक मृत्यूच्या बाबतीत पोलिसांच्या गरजेनुसार जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा ग्रामीण रुग्णालयातच शवविच्छेदन करून घ्यावे, असे पत्र जिल्हा रुग्णालयाकडून जिल्हा आरोग्य अधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना सहा महिन्यापूर्वीच पाठविण्यात आले आहे. मात्र, तरीही अनेकदा त्या-त्या ठिकाणी शवविच्छेदन करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा जिल्हा रुग्णालय प्रशासनाचा आरोप आहे. दरम्यान, असे पत्र आपणास मिळालेच नाही, असे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

शासन निर्णयानुसार ज्या संस्थेत मृतदेह विच्छेदनासाठी आणला जाईल, त्या संस्थेला शवविच्छेदन करावेच लागते. लोणंदच्या घटनेत मृत्यूचे कारण समजण्यासाठी तज्ज्ञांचे मत महत्त्वाचे ठरणार असल्यामुळे मृतदेह साताऱ्याला पाठविण्यात आला. तसा फोन मलाही आला होता.
- डॉ. दिलीप माने,
जिल्हा आरोग्य अधिकारी

Web Title: Postmortem ... the ability to abstain?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.