कृष्णाची निवडणूक स्थगित करा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:28 AM2021-05-28T04:28:49+5:302021-05-28T04:28:49+5:30
कऱ्हाड : कोरोना संसर्ग संकटाने अवघे समाजजीवन अडचणीत आले आहे. कोरोना संक्रमण थांबवण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. कडक ...
कऱ्हाड : कोरोना संसर्ग संकटाने अवघे समाजजीवन अडचणीत आले आहे. कोरोना संक्रमण थांबवण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. कडक टाळेबंदीसारखा कटू प्रयोग राबविणे कमप्राप्त झाले आहे. अशा परिस्थितीत कराड तालुक्यात कृष्णा कारखान्याची होणारी निवडणूक हा विरोधाभास आहे. ही निवडणूक त्वरित स्थगित करावी, अशी मागणी मनसेचे कराड शहर अध्यक्ष सागर बर्गे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली पाहून नागरिकांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे. दैनंदिन जीवनावर निर्बंध घालण्यात येत असताना निवडणुकांसारखे कार्यक्रम राबविले जात असतील तर यासारखे दुर्दैव नाही. नागरिकांमध्ये असणारे कोरोनाचे गांभीर्य टिकवून ठेवायचे असेल तर निवडणुका पुढे ढकलणे ही काळाची गरज आहे.
या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये येणारे सांगली, सातारा जिल्ह्यातील मतदार, निवडणुकीत राबणारे शासकीय यंत्रणेतील कर्मचारी या सर्व लोकांच्या जीवाशी खेळ तर होत नाही ना? नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील निवडणुका तसेच पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीनंतर तेथे वाढलेला कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता ही सध्या होऊ घातलेली कृष्णा कारखान्याची निवडणूक स्थगित करून पुढे योग्य वेळी घ्यावी.
कृष्णाच्या निवडणुकीत उतरणारे मान्यवर हे समाजातील संवेदनशील नेते आहेत. ते जनतेच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदैव प्रयत्नशील असतात. या सर्व नेत्यांनीही निवडणूक स्थगित करण्याचा आग्रह धरून आपण जनतेच्या भल्यासाठी निवडणुकीचा काही काळापुरता का होईना त्याग करू शकतो, असा निर्णय घेऊन जनतेप्रति असणारी काळजीची भावना सिद्ध करावी. दरम्यान, या निवेदनाची प्रत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनाही देण्यात आली आहे.