वारीसाठी ईद पुढे ढकलली
By admin | Published: July 1, 2016 11:34 PM2016-07-01T23:34:28+5:302016-07-01T23:35:42+5:30
लोणंद : मुस्लिम समाजाकडून सामाजिक सलोखा
लोणंद : आषाढी वारी पालखी सोहळ्यातील वारकरी व भाविकांना अडचणी येऊ नयेत म्हणून रमजान ईदचा सण दुसऱ्या दिवशी म्हणजे दि. ७ रोजी साजरा करण्याचा व सामाजिक सलोख्याचा निर्णय लोणंद येथील मुस्लीम समाजबांधवांनी घेतला आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने सातारा जिल्ह्यात प्रवेश केल्यावर पहिला मुक्काम लोणंद येथे असतो. लोणंद येथे पालखी सोहळ्याचा मुक्काम दि. ५ जुलै रोजी असणार आहे. तर प्रस्थान दि. ६ जुलै रोजी दुपारी एक वाजता होणार आहे.
मुस्लीम समाज बांधवांचा पवित्र रमजान ईद हा बुधवार, दि. ६ जुलै रोजी आहे. त्यादिवशी पालखी सोहळ्यातील वारकरी व भाविकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत. पालखी सोहळ्याचे पावित्र्य जपले जावे म्हणून लोणंद येथील मुस्लीम समाज बांधवांनी ईद गुरुवार, दि. ७ जुलै रोजी साजरी करण्याचे ठरविले आहे.
गावात येणाऱ्या पालखी सोहळ्याचे एकत्रपणे स्वागत करूया व पालखी प्रस्थान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ईद साजरी करू, असा प्रस्ताव अॅड. बाळासाहेब बागवान यांनी मुस्लीम समाजातील बांधवांपुढे मांडला होता. तो एकमताने मंजूर करण्यात आला. (वार्ताहर)
बाळासाहेब बागवान व सर्व मुस्लीम बांधवांचे निर्णय हे ऐक्य टिकविण्यासाठी व गावाच्या हिताचे असतात. त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे.
- शामसुंदर डोईफोडे
लोणंद येथील पालखी सोहळ्यामध्ये मुस्लीम बांधवही हिरीरीने भाग घेतात. हिंदू बांधवही ईदमध्ये तेवढ्याच उत्साहाने सहभागी होतात. त्यामुळे हिंदू-मुस्लीम बांधवांचे ऐक्य टिकविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
- अॅड. बाळासाहेब बागवान