पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खड्डे; ...अन्यथा ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार; पालकमंत्र्यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 12:38 PM2024-08-06T12:38:05+5:302024-08-06T12:38:28+5:30
महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदत
सातारा : सातारा जिल्ह्यातील पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खड्डे पडले असून, यामुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तातडीने सर्व खड्डे बुजवून रस्ता दुरुस्त करावा. येत्या १५ ऑगस्टपर्यंत सर्व खड्डे न बुजवल्यास संबंधित ठेकेदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला.
राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. पुलांची, सेवा रस्त्यांची अपूर्ण कामे, मूलभूत सार्वजनिक सुविधांचा अभाव यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून, जीवितहानी होत आहे. याबाबत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी वाढू लागल्याने याची गंभीर दखल घेत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी तसेच महामार्गाचे काम करणाऱ्या रिलायन्स व अन्य एका कंपनीच्या अधिकाऱ्यांची सोमवारी बैठक लावली.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत शंभूराज देसाई म्हणाले, आता पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे तातडीने रस्त्यावर पडलेले खड्डे नवीन हॉटमिक्स पद्धतीच्या तंत्रज्ञानाने भरावेत. येत्या १५ ऑगस्टपर्यंत सर्व खड्डे बुजवले नाहीत तर संबंधित ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेल्या रस्त्यांवरील खड्डेही बुजवावेत. कुठेही अपघात होणार नाही, यासाठी रस्ता सुस्थितीत आणावा. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक घ्यावी, अशा सूचनाही पालकमंत्री देसाई यांनी बैठकीत केल्या.
कऱ्हाड-चिपळूण रस्त्याच्या कामास लवकरच सुरुवात
कऱ्हाड-चिपळूण रस्त्याचे काम दोन वर्षे रखडले होते. गेल्यावर्षी त्याची बैठक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणसमवेत झाली होती. ते काम मंजूर झाले असून, ८० ते ८५ कोटी रुपयांची निविदा मंजूर झाली आहे. येत्या १५ दिवसांत हेही काम सुरू होईल. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने अथवा ठेकेदारांनी यात हलगर्जीपणा केला तर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.