खड्ड्यांची जबाबदारी वर्षभर ठेकेदारांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 11:06 PM2017-12-06T23:06:49+5:302017-12-06T23:07:52+5:30

Poths responsibility contractors throughout the year | खड्ड्यांची जबाबदारी वर्षभर ठेकेदारांची

खड्ड्यांची जबाबदारी वर्षभर ठेकेदारांची

Next


सातारा : जिल्ह्यातील राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गांवर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती बांधकाम विभागाच्या माध्यमातून युद्धपातळीवर सुरू आहे. जवळपास ९९ टक्के काम पूर्ण झाले असून, या रस्त्यांवर पुन्हा त्याच ठिकाणी खड्डे पडले तर त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित ठेकेदारावर राहणार आहे. त्यामुळे शासनाच्या तिजोरीवर याचा ताण येणार नाही.
विदर्भ, मराठवाड्याच्या तुलनेत सातारा जिल्ह्यात जास्त पाऊस पडतो. रस्ते करण्याची प्रचलित पद्धत कायम आहे. अनेकदा पाऊस पडला की रस्ता खराब होतो, हे नेहमीचे गणित आहे. यंदा तर पावसाने हद्दच केल्याने जिल्ह्यातील बहुतांश रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली. संपूर्ण राज्यात हीच परिस्थिती होती. रस्त्यांची चाळण झाल्याने सर्वच माध्यमांतून सरकारवर टीका होऊ लागली.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील खराब झालेल्या ९२८ किलोमीटर अंतरातील राज्यमार्ग व १ हजार ५०० किलो मीटर अंतरातील प्रमुख जिल्हा मार्गांचे काम बांधकाम विभागाने टार्गेट ठेवले. मध्यंतरीच्या काळात राज्याच्या धर्तीवर एकच डीएसआरचा निर्णय आणि त्यानंतर अंमलात आलेली जीएसटी करप्रणाली याला विरोध करत बांधकाम ठेकेदारांनी कामांवर बहिष्कार टाकला होता. कुठल्याही शासकीय कामाचे टेंडर भरायचे नाही, असे धोरण ठरवून ठेकेदारांनी काम बंद ठेवले, याचा परिणाम म्हणून पावसाळ्याआधी टेंडर प्रक्रिया झाली नाही. त्याचा परिणाम म्हणून रस्त्यावरील खड्डेही मुजविले गेले नाहीत.
नोव्हेंबर महिन्यात टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली. ६ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली. मंत्रालय आणि प्रत्येक जिल्ह्याच्या बांधकाम विभागातील वॉररूमही तयार करण्यात आली. दीड महिन्यात तब्बल २ हजार ४२८ किलोमीटर अंतरातील रस्त्यांवरील खड्डे मुजवायचे काम सुरू करण्यात आले.
पूर्ण झालेल्या कामाचे रिपोर्ट रोजच्या रोज बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना सायंकाळी पाच वाजता मिळत होते. ते मंत्रालयात पाठविले जाऊ लागले आहेत. ठेकेदारांचे ८५ युनिट जिल्हाभर कार्यरत आहेत. एका कामावर २० कामगार असे एकूण १ हजार ७०० कामगार राबत आहेत.
हे काम वेगाने करायचे असले तरी संबंधित ठिकाणी पुन्हा खड्डा पडल्यास त्याची दुरुस्ती करण्यासाठी ठेकेदाराला वेगळे पैसे मिळणार नाहीत.
दिलेल्या रकमेतच दुरुस्तीचे
काम करावे लागणार आहे. त्यांना
तशी अटही घातली गेली असल्याने सुदैवाने रस्त्यांवर लगेच खड्डे
पडतील, ही शक्यता सध्या तरी दिसत नाही.
मोबाईल युनिट वर्षभर राहणार सज्ज
रस्त्यावर खड्डा पडल्यानंतर लोकांनी आवाज उठविण्याची वाट पाहायची गरज नाही. संबंधित ठेकेदाराने केलेल्या कामांच्या ठिकाणी मोबाईल युनिट सर्व्हे करण्यासाठी पाठवायचे आहे. भरलेला खड्डा पुन्हा खराब झाला असल्यास तो भरण्याचे काम तत्काळ हाती घ्यायचे आहे.
ओखीच्या संकटामुळे
मोठा गतिरोधक
दोन दिवसांपासून ओखी वादळाच्या परिणामामुळे जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडत आहे. पाऊस आणि डांबराचे वैर असते, साहजिकच पावसामुळे रस्त्यांच्या कामांमध्ये मोठा गतिरोधक उभा राहिला आहे.

Web Title: Poths responsibility contractors throughout the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.