डोईवर हंडे.. पायाला चटके !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:12 AM2021-03-13T05:12:07+5:302021-03-13T05:12:07+5:30
पेट्री : पश्चिमेस डोंगर पठारावरील गावांमध्ये दिवसेंदिवस उष्णता वाढून झऱ्याचे पाणी कमी होत पाणीटंचाईचे गडद संकट निर्माण होऊन कुसुंबीमुरा ...
पेट्री : पश्चिमेस डोंगर पठारावरील गावांमध्ये दिवसेंदिवस उष्णता वाढून झऱ्याचे पाणी कमी होत पाणीटंचाईचे गडद संकट निर्माण होऊन कुसुंबीमुरा (जावळी) येथील आखाडेवाडीतील ग्रामस्थांना तीव्र उन्हाचे चटके सोसत पायपीट करून डोक्यावरून पाणी आणावे लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी रात्र-रात्र जागून पाणी भरावे लागत आहे. रात्री उंच कड्याकपारीत झऱ्याचे पाणी मिळवण्याच्या कसरतीतून पाय घसरूण विपरित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेकडो जनावरांदेखील पाणीटंचाईच्या समस्येशी संघर्ष करावा लागत आहे.
कुसुंबीमुरा येथील २४ कुटुंबे असणाऱ्या आखाडेवाडीतील १५०-२०० लोकसंख्या असणाऱ्या ग्रामस्थांना आतापर्यंत टाकीतून पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा होत होता. ज्या झऱ्यातून पाणी टाकीत सोडले जात होते, त्या झऱ्याचेच पाणी कमी होऊ लागल्याने मागील आठवड्यात झऱ्यातून टाकीत आणण्याचा पाणीपुरवठा बंद झाला. सद्य:स्थितीला झऱ्याचे पाणी मोठ्या प्रमाणावर कमी होऊन डोंगरातील एकूण तीन-चार झऱ्यांवर दोनशे-अडीचशे फूट खोल कड्यालगत झऱ्यावर रात्रं-दिवस पाणी भरण्यासाठी महिला, लहानगे, पुरुष मंडळी दिसत आहे.
डोंगरदरी, झाडा-झुडपांच्या मार्गाने छोट्या भांड्याने लहानगे, महिला, पाण्यासाठी धडपडत आहेत. पावसाळा सुरू व्हायला बराचसा कालावधी असून, वेळेत पडला तर ठीक अन्यथा पठारावरील अनेक गावांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. अवकाळी पावसाने झऱ्याचे पाणी वाढले जात नसून पावसाळ्यातील पावसाने जेव्हा पठारावर पाणी साचून राहते तेव्हाच झऱ्याच्या पाण्यात वाढ होते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
ग्रामस्थ शेतीची कामे सोडून पाण्यासाठी भटकंती करत असून दिवसभर लहानगे भांडी घेऊन झऱ्यावर तळ ठोकून आहेत. झरा लोकवस्तीपासून काही अंतरावर असल्यामुळे आपल्या कुटुंबाची तहान भागविण्यासाठी महिलांना डोंगरातून कडक उन्हात डोक्यावरून पाणी भरावे लागत आहे. डोंगर उतारावर पावसाचे पाणी अडविण्यासाठी चरी काढल्याने उंचमाथ्यावर आखाडेवाडी असल्याने त्याचा फायदा होणार नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
(चौकट)
दिवसा-उन्हाचा तर रात्री श्वापदांची भीती...
झऱ्यावर ग्रामस्थ नंबर लावून रात्रभर जागून आळीपाळीने पाणी भरत आहेत. तसेच रात्री पाण्यासाठी बाहेर पडायचं म्हटलं तर वन्यश्वापदांची भीती. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची गरज भागविणारे डोंगरकपारीतील झरेही आता आटण्याच्या मार्गावर आहेत. डोंगरी भागात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अद्याप भेडसावत नसला तरी पाण्यासाठी गुराख्यांना डोंगरावर झऱ्यांचा शोध घ्यावा लागत आहे.
(कोट...)
मुबलक पाणी उपलब्ध होण्यासाठी झऱ्यांचा शोध घेऊन लोकसहभागातून बरेचसे प्रयत्न केले. उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. २००५-२००६ पासून गाव पाणीटंचाईग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले. प्रशासनाकडून बोअर मिळावी तसेच लवकरात लवकर टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जावा.
-ज्ञानेश्वर आखाडे,आखाडेवाडी (कुसुंबीमुराद्ध
१२पेट्री
फोटो आहे...