पोल्ट्री व्यावसायिकांनी योग्य काळजी घ्यावी : प्रफुल्ल घोडके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:39 AM2021-01-25T04:39:09+5:302021-01-25T04:39:09+5:30
कुडाळ : पोल्ट्री व्यावसायिकांनी बर्ड फ्लू आजाराबाबत भीती न बाळगता योग्य ती काळजी घेतली तर याला वेळीच ...
कुडाळ : पोल्ट्री व्यावसायिकांनी बर्ड फ्लू आजाराबाबत भीती न बाळगता योग्य ती काळजी घेतली तर याला वेळीच प्रतिबंध करणे शक्य आहे. नागरिकांनी याबाबत भीती घेऊ नये,’ असे
प्रतिपादन जावळीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रफुल्ल घोडके यांनी केले.
पंचायत समिती जावळी पशुवैद्यकीय विभाग व पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ कुक्कुटपालन व्यावसायिकांसाठी बर्ड फ्लू आजाराबाबत तांत्रिक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जावळीचे पशुधनविकास अधिकारी डॉ. विवेक इटकेकर यांनी मार्गदर्शन केले. परिसरातील कुक्कुटपालन करणारे व्यावसायिक उपस्थित होते.
डॉ. घोडके म्हणाले, ‘पोल्ट्री व्यवसायधारकांनी
पक्ष्यांची खाण्याची व पाणी पिण्याची भांडी नियमित स्वच्छ करावीत. पक्ष्यांना
लसीकरण करावे आणि पक्षागृहाची नियमित स्वच्छता ठेवावी. कोणताही पक्ष्याला मरतुकी आल्यास तत्काळ पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करावा. पक्ष्यांशी
हाताळणी केल्यास साबणाने स्वच्छ हात धुवावेत. पक्षागृहाचा परिसर निर्जंतुकीकरण करावा, अशी दक्षता घेतल्यास या आजाराचा वेळेत अटकाव करता येईल.’
चौकट..
बर्ड फ्लू असल्यास असाधारण मरतुकी असते. याठिकाणी २४ तासांत ५० ते ७० टक्के मरतुकी आढळते. कुडाळ याठिकाणी शेख वाड्यात मृत कोंबड्या यासंदर्भात प्रथमदर्शी काही लक्षणे आढळली नाहीत. आजारी कोंबड्यावर उपचार केले असून, त्या बऱ्या झाल्या आहेत. तरीही प्रतिबंध उपाय म्हणून मृत कोंबड्याची तपासणीसाठी पुणे येथे पाठविले आहे. दोन-तीन दिवसांत याचा अहवाल येईल आणि नेमके कारण स्पष्ट होईल. नागरिकांनी घाबरून जाऊ नये.