पोवई नाक्यावर हेरलं.. दुचाकीस्वारांना ‘घेरलं’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:26 AM2021-07-04T04:26:20+5:302021-07-04T04:26:20+5:30
सातारा : शनिवार, रविवार लाॅकडाऊनमध्ये विनाकारण बाहेर फिरणाऱ्या वाहनचालकांना पोवई नाक्यावर हेरून पोलिसांनी चारही बाजूंनी घेरलं. यामध्ये संचारबंदीचे उल्लंघन ...
सातारा : शनिवार, रविवार लाॅकडाऊनमध्ये विनाकारण बाहेर फिरणाऱ्या वाहनचालकांना पोवई नाक्यावर हेरून पोलिसांनी चारही बाजूंनी घेरलं. यामध्ये संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ४६ दुचाकीस्वारांवर कडक दंडात्मक कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे यावर देखरेख करण्यासाठी खुद्द पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल हे स्वत: रस्त्यावर उभे होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू केलीय.
जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याच्या मार्गावर असतानाच पुन्हा या लाटेने डोके वर काढलंय. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नव्याने निर्बंध घातले आहेत. शनिवार आणि रविवार हे दोन दिवस सुटीचे असल्यामुळे नागरिक काहीही करणे सांगून घराबाहेर पडतात. हे माहीत असल्यामुळे प्रशासनाने या दोन दिवसांत पूर्णपणे संचारबंदी लागू केली आहे. मात्र, तरीसुद्धा अनेकजण खोटी कारणे सांगून घराबाहेर पडत आहेत. अशा लोकांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी शनिवारी पोवई नाक्यावर चारही बाजूने बंदोबस्त लावला. शहरातून बाहेर पडणारे आणि शहरात येणाऱ्या वाहनचालकांना अडविण्यात येत होते. या ठिकाणी खुद्द पोलीस अधीक्षकच हजर असल्याने पोलिसांनीही कोणाचीही गय केली नाही. संयुक्तिक कारण ज्यांचे नव्हते, अशा वाहनचालकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. तर काहीजणांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केला.
शहरातील राजवाडा, मोती चाैक, देवी चाैक या ठिकाणी अक्षरश: शुकशुकाट होता. शहरातही नागरिकांची वर्दळ नव्हती. काही दुकाने सुरू होती. त्यामुळे नागरिक दुकानासमोर उभे होते. दुपारी दोननंतर सर्व दुकाने बंद झाली. शनिवारी अचानक निर्बंध वाढविल्यामुळे अनेक व्यावसायिक संभ्रमात पडले. त्यामुळे सकाळी अनेकांनी दुकाने उघडली होती. परंतु पोलिसांनी गस्त घालण्यास सुरुवात केल्यानंतर दुकानांचे शटर खाली घेण्यात आले.
चाैकट :
पोलिसांकडून दुचाकीस्वारांची पोलखोल..
दुचाकीस्वारांना अडविल्यानंतर कुठे गेला होता, असा पोलिसांचा पहिला प्रश्न होता. या प्रश्नावर अनेक वाहनचालकांची पुढील उत्तरे होती. लस घेण्यासाठी गेलो होतो, वडील दवाखान्यात आहेत, मित्राला डबा घेऊन गेलो होतो, मेडिकलमध्ये निघालोय, अशी एक ना एक कारणे वाहनचालक सांगत होते. यातील काहींच्या कारणांची पोलिसांनी खातरजमा केली. त्यावेळी बरेचजण खोटे बोलत असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी अशा वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई तर केलीच, शिवाय आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हाही दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.