वटवृक्ष वाचविण्यासाठी वीज वाहिनी ‘अंडरग्राऊंड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:26 AM2021-06-26T04:26:05+5:302021-06-26T04:26:05+5:30
कऱ्हाड : येथील पंताच्या कोटातील सिध्दीविनायक गणपती मंदिराजवळ अंतर्गत विद्युत केबल टाकण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. आरोग्य सभापती ...
कऱ्हाड : येथील पंताच्या कोटातील सिध्दीविनायक गणपती मंदिराजवळ अंतर्गत विद्युत केबल टाकण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांनी महावितरणकडे सातत्याने पाठपुरावा करून पालिकेच्या माध्यमातून हे काम पूर्ण करून घेतल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
शहरातील सोमवार पेठेतील पंताच्या कोटात असलेल्या सिद्धीविनायक गणपती मंदिराजवळ शेकडो वर्षांपूर्वीचे महाकाय वडाचे झाड आहे. या वडाच्या झाडाजवळून महावितरणची मुख्य विद्युत वाहिनी गेली आहे. सोसाट्याचा वारा व पावसाळ्यात या महाकाय वटवृक्षाच्या फांद्या तुटून मुख्य विद्युत वाहिनीवर पडत होत्या. त्यामुळे ही विद्युत वाहिनी तुटून शॉर्टसर्किट तसेच अपघात होण्याच्या घटना वारंवार घडत होत्या. शॉर्टसर्किट होऊन विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या घटनांमुळे या परिसरातील नागरिक अक्षरश: त्रस्त झाले होते. मुख्य विद्युत वाहिनीला अडथळा ठरणारे वडाचे झाड तोडण्यात यावे, अशी मागणी काही नागरिकांनी केली होती. तर शेकडो वर्षांपूर्वीचे हे झाड तोडू नये, अशी मागणी काही वृक्षप्रेमींनी केली होती.
लोकभावनांचा आदर करून नगरसेवक, आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांनी या वडाच्या झाडाला धक्का लागू न देता पालिकेच्या माध्यमातून याठिकाणी अंतर्गत विद्युत वाहिनी टाकण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी महावितरणकडे सातत्याने पाठपुरावा करून तांत्रिक मंजुरी घेतली. नुकतेच याठिकाणी अंतर्गत विद्युत केबल टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. या कामाचे उद्घाटन आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अजित नवाळे, सहाय्यक अभियंता विकास जगताप, सहाय्यक अभियंता बी. ए. पवार, पालिकेचे विद्युत निरीक्षक रणजित भोसले, कृष्णा थोरात यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
- कोट
वटवृक्षामुळे पंताच्या कोटात शॉर्टसर्किट होऊन विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या घटना वारंवार घडत होत्या. या परिसरात शाळा, महाविद्यालय व कोचिंग क्लासेस आहेत. त्यामुळे याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसत होता. प्रभागाचे नगरसेवक विजय वाटेगावकर यांनी लक्ष घालून या ठिकाणची समस्या कायमस्वरूपी मिटवली आहे. ही या परिसरातील नागरिकांसाठी आनंदाची बाब म्हणावी लागेल.
- विनायक ढवळे, नागरिक
फोटो : २५ केआरडी ०१
कॅप्शन : कऱ्हाडात पंताचा कोट येथे अंडरग्राऊंड वीज वाहिनीच्या कामाचा प्रारंभ नगरसेवक विजय वाटेगावकर यांच्या हस्ते करण्यात आला.