मलकापुरात विजेचा लपंडाव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:30 AM2021-04-29T04:30:44+5:302021-04-29T04:30:44+5:30
मलकापूर : वादळी वाऱ्याने मुख्य लाइनसह विद्युतवाहक तारांवर झाडांच्या फांद्या पडल्यामुळे मंगळवारी मलकापुरातील विद्युतपुरवठा खंडित झाला होता. मंगळवारी रात्रभर ...
मलकापूर :
वादळी वाऱ्याने मुख्य लाइनसह विद्युतवाहक तारांवर झाडांच्या फांद्या पडल्यामुळे मंगळवारी मलकापुरातील विद्युतपुरवठा खंडित झाला होता. मंगळवारी रात्रभर दुरुस्ती करूनही शहरातील विद्युतपुरवठा सुरळीत झाला नाही. ठिकठिकाणी बिघाड झाल्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांची बुधवारी दुरुस्तीची कसरत सुरू होती. त्यामुळे दहा-दहा मिनिटाला विजेचा लपंडाव सुरू होता.
मलकापुरात मंगळवारी वादळासह विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाने थैमान घातले. शहरातील अयोध्या कॉलनी परिसरासह ठिकठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्याने विद्युतवाहक तारा तुटल्याने शहरातील विद्युतपुरवठा खंडित झाला होता. या अस्मानी संकटातही महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विद्युतपुरवठा सुरू केला. मात्र, काही भागात रात्रभर कमी दाबानेच विद्युतपुरवठा झाला. बुधवारी पुन्हा तीच-तीच नादुरुस्त अडचण झाल्यामुळे पुन:पुन्हा पाणीपुरवठा खंडित झाला. महावितरण शाखा अभियंता यू.आर. धर्मे यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी दुरुस्तीच्या कामासाठी परिश्रम घेतले. अस्मानी संकटामुळे गेले २४ तास मलकापूरसह कापील, गोळेश्वर, नांदलापूर परिसरातील रानावनात फिरून दुरुस्ती करत होते. मात्र, एका ठिकाणी दुरुस्ती करून विद्युतपुरवठा सुरू करताच दुसरा प्रॉब्लेम झाल्यामुळे पुन्हा विद्युतपुरवठा खंडित व्हायचा, असे बुधवारी ५ वाजेपर्यंत शहरात दहा-दहा मिनिटाला विजेचा लपंडाव सुरू होता.