औंधसह १३ गावांतील वीजजोडणी तोडली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:26 AM2021-07-02T04:26:27+5:302021-07-02T04:26:27+5:30
औंध : औंधसह परिसरातील १३ गावातील पथदिवे वीजजोडणी व पिण्याच्या पाण्याची तोडलेली वीजजोडणी वीज वितरणने त्वरित जोडावीत, अशी ...
औंध : औंधसह परिसरातील १३ गावातील पथदिवे वीजजोडणी व पिण्याच्या पाण्याची तोडलेली वीजजोडणी वीज वितरणने त्वरित जोडावीत, अशी मागणी औंधसह १३ गावच्या सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी लेखी निवेदनाद्वारे वीज वितरण कंपनीचे उपअभियंता सुभाष घाटोळ यांच्याकडे केली आहे. याबाबत त्वरित ठोस कारवाई करण्याची मागणीही या वेळी सरपंचांच्या शिष्टमंडळाने केली.
मागील आठ ते दहा दिवसांपासून औंधसह परिसरातील अंभेरी, कोकराळे, भोसरे, जायगाव, नांदोशी, येळीव, गोपूज, करांडेवाडी, गणेशवाडी व अन्य गावातील पथदिवे वीजजोडणी व अनेक गावांतील पिण्याच्या पाण्याच्या योजनेची वीज जोडणी वीजवितरण कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कट केली आहेत.
त्याचा परिणाम अनेक गावांमध्ये कोरोना संकटाबरोबरच हे नवीन संकट उभारले आहे. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे तसेच रात्रीच्या रस्त्यावरील अंधारामुळे आजारी रुग्णांचे हाल होऊ लागले आहेत. तसेच ठिकठिकाणी चोरटेही धुमाकूळ घालू लागले आहेत. नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी त्वरित वीजवितरण कंपनीने ही वीजजोडणी जोडावीत, याबाबत जनआंदोलन छेडले गेल्यास यास सर्वस्वी वीजवितरण कंपनी जबाबदार राहील, असा इशारा सरपंचांच्या शिष्टमंडळाने उपअभियंता सुभाष घाटोळ व ज्युनिअर अभियंता रुपेश लादे यांना दिलेल्या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या वेळी औंधचे उपसरपंच दीपक नलवडे, जायगावचे सरपंच नवनाथ देशमुख, येळीवचे सरपंच केशव जाधव, कोकराळे सरपंच भीमराव मदने, अंभेरीचे सरपंच रवींद्र शिंदे, भोसरेचे उपसरपंच सतीश जाधव, गणेश देशमुख, तानाजी इंगळे, चंद्रकांत घार्गे, अॅड. संतोष कमाने, संजय जाधव गावोगावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते.