हिंगणगाव-आदर्की रस्त्याशेजारील विद्युतखांब धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:25 AM2021-07-08T04:25:56+5:302021-07-08T04:25:56+5:30
आदर्की : फलटण तालुक्यातील हिंगणगाव-आदर्की खुर्द रस्त्याच्या कडेला असलेला विद्युतखांब आडवा होऊन धोकादायक झाला आहे. तरी संबंधित विभागाने धोकादायक ...
आदर्की : फलटण तालुक्यातील हिंगणगाव-आदर्की खुर्द रस्त्याच्या कडेला असलेला विद्युतखांब आडवा होऊन धोकादायक झाला आहे. तरी संबंधित विभागाने धोकादायक खांब सुरळीत करून संभाव्य धोका टाळण्याची मागणी प्रवासी, ग्रामस्थांमधून होत आहे.
फलटण तालुक्यात लघु उद्योग वाढल्याने व धोम-बलकवडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून पाणी आल्याने विजेचे मागणी वाढली आहे. त्यामुळे वेळेत वीज मिळावी, त्यासाठी उद्योजक, शेतकरी वीजवितरण कंपनी, ठेकेदार यांना पैसे देऊन वीज कनेक्शन घेतात; पण ठेकेदार खांब उभे करणे, तारा ओढणे आदी कामे व्यवस्थित करीत नसल्याने खांब तिरके होतात, तारा तुटतात. त्यामुळे अपघात होतात. हिंगणगाव-आदर्की खुर्द रस्त्याकडेने मुख्य विद्युतवाहिनी गेली आहे. त्या वाहिनीचे एक-दोन खांब तिरके झाले आहेत, ते कधीही मोडून रस्त्यावर पडण्याची शक्यता आहे. एक विद्युतखांब पडला तर अन्य खांब पडून तारा तुटण्याची शक्यता आहे. तरी संबंधित विभागाने तिरके झालेले खांब सरळ करून संभाव्य होणारा धोका टाळावा, अशी मागणी प्रवासी व ग्रामस्थांमधून होत आहे.
कोट...
हिंगणगाव-आदर्की रस्त्याच्या शेजारी चार-पाच महिन्यांपासून विद्युतखांब तिरपा झाल्याने धोकादायक आहे. वीजवितरण कंपनीचे अधिकारी-कर्मचारी या रस्त्याने ये-जा करत असतात. तरी ही दुर्लक्ष करीत आहेत.
-सागर जाधव, ग्रामपंचायत सदस्य, आदर्की बुद्रुक
०७आदर्की
फोटो -हिंगणगाव-आदर्की खुर्द रस्त्यावर विद्युतखांब आडवा झाला आहे.