सत्तेचा उष:काल शोधण्यासाठी ‘रात्रीचा दिवस’

By admin | Published: October 24, 2016 12:38 AM2016-10-24T00:38:40+5:302016-10-24T00:38:40+5:30

कार्यकर्त्यांचा बैठकीवर जोर : भाजपा-शिवसेनेच्या युवतीवर ठरणार दिशा; इच्छुक उमेदवारांची संख्या वाढली

The power of power: 'Night of the night' to find the day | सत्तेचा उष:काल शोधण्यासाठी ‘रात्रीचा दिवस’

सत्तेचा उष:काल शोधण्यासाठी ‘रात्रीचा दिवस’

Next

खंडाळा : खंडाळा नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. सर्वच पक्षांनी पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला असून, सत्तेचा उष:काल शोधण्यासाठी रात्रीचा दिवस केला जातोय. योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी प्रभागातून कार्यकर्त्यांच्या बैठकीवर जोर दिला जात आहे.
अर्ज भरण्यापूर्वीच कार्यकर्त्यांत समेट घडवून सक्षम उमेदवार रिंगणात उतरविण्याची तयारी सर्व प्रमुख पक्षांनी चालविली आहे. त्यामुळे खंडाळ्यात सध्यातरी उद्याच्या त्यासाठी प्रभागवार कार्यकर्त्यांच्या मीटिंगचा खेळ शिताफीने मांडला जात असल्याचे चित्र आहे.
खंडाळा नगरपंचायतीसाठी १७ नगरसेवकांच्या जागेच्या उमेदवारी अर्ज २४ आॅक्टोबरपासून भरले जाणार आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रभागात इच्छुक असलेल्या उमेदवारांची चाचपणी वेगाने सुरू आहे. मात्र, उमेदवार देताना तो कार्यकर्त्यांच्या सहमतीने दिला जावा, अशी भूमिका प्रमुख पक्षाच्या श्रेष्ठींनी घेतला असल्याने प्रभागावर बैठकांचे जोरदार सत्र सुरू आहे. इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने पक्षश्रेष्ठींसाठी ती मोठी डोकेदुखी ठरणार आहे. अर्ज भरण्यापूर्वीच मनधरणी करण्याचा प्रयत्न करून अनेकांना थोपावण्याची भूमिका घेतली जात आहे. मात्र इच्छुकांच्या आशा बळावल्यामुळे उत्स्फूर्त प्रतिसादाला बांध घालणे अवघड बनणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा समन्वय कसा राखणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
खंडाळ्याची निवडणूक ही काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपा या प्रमुख पक्षांच्या भोवती फिरणार हे निश्चित आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी पारंपरिक लढतीत भाजपा-शिवसेनाही उतरली असल्याने चांगलीच चुरस वाढली आहे. मात्र संख्या बळानुसार सेना-भाजपा एकत्र येणार का अशीही चर्चा सध्या सुरू आहे.उमेदवारी मिळविण्यासाठी आपापल्या प्रभागातील कार्यकर्त्यांना घेऊन नेत्यांच्या घराचे उंबरे ओलांडले जात आहेत.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे इच्छुकांची मोठी संख्या असल्याने किमान अर्ज भरण्यासाठी सगळ्यांनाच प्रवृत्त केले जाईल. त्यानंतर उमेदवारी निश्चितीकडे लक्ष दिले जाण्याची शक्यता आहे. तर काही प्रभागातून आपण आजपर्यंत निष्ठेने पक्षाचे काम करीत आले आहे. त्यामुळे यावेळी आपलीच वर्णी लागली पाहिजे, असे म्हणणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे. त्यामुळे कोण किती पाण्यात आहे, याचा शोध नेत्यांकडून घेतला जाईल, हे निश्चित. काँग्रेस-राष्ट्रवादीचा जोर कायम राखणार असला तरी भाजपा-शिवसेनेची गणिते ही रणांगणाची दिशा ठरविणारी असणार आहे.
प्रभाग अकरा मधून रिपब्लिकन पक्ष स्वतंत्र लढणार का? यावर तेथील लढतीचे चित्र ठरणार आहे. आरपीआय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपा-शिवसेनेची रणनीती सध्यातरी एकला चलो रे चीच आहे. दरम्यान आमदार मकरंद पाटील यांनी इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. (प्रतिनिधी)
करडी नजर
सध्या सर्व पक्षांच्या गुफ्तगू बैठकांनी जोर धरला आहे. मात्र, या बैठकांना आपल्या गोटातील कोण जातोय, यावर बारकाईने नजर ठेवली जात आहे. याशिवाय प्रतिस्पर्धी पक्षांच्या बैठकांचा सूर काय होता, याची माहिती मिळविण्यासाठी व्यूहरचना सुरू आहे.
 

Web Title: The power of power: 'Night of the night' to find the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.