तासगाव पालिकेवर संजयकाकांची सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2015 12:47 AM2015-09-15T00:47:21+5:302015-09-15T00:50:45+5:30

नगराध्यक्षांचा राजीनामा : राष्ट्रवादीला हादरा, १८ पैकी १६ नगरसेवकांकडून अविश्वास ठराव दाखल

Power of Sanjayakak on the Tasgaon Municipal Corporation | तासगाव पालिकेवर संजयकाकांची सत्ता

तासगाव पालिकेवर संजयकाकांची सत्ता

googlenewsNext

तासगाव : खासदार संजयकाका पाटील यांच्या चाणक्यनीतीमुळे सोमवारी तासगाव नगरपालिकेत त्यांचा गट सत्तेत आला. काँग्रेसचे नगराध्यक्ष अजय ऊर्फ संजय पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे राजीनामा सादर केला. तत्पूर्वी, खासदार पाटील समर्थक नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल केला. पालिकेतील १८ पैकी १६ नगरसेवकांनी अविश्वास ठरावावर सह्या केल्या आहेत. आर. आर. पाटील (आबा) गटाकडे आता एकमेव नगरसेवक राहिला असून, राष्ट्रवादीला मोठा हादरा बसला आहे.
तासगाव पालिकेत आबा गटाचे ११, तर दोन अपक्ष मिळून काका गटाचे ८ आणि एक काँग्रेसचा असे बलाबल होते. जयश्री धाबुगडे यांच्या काका गटातील प्रवेशाने त्यांचे ९ सदस्य झाले, तर आबा गटाकडे १० सदस्य राहिले होते. त्यातच आबा गटातील आयेशा नदाफ अपात्र ठरल्याने आबा गटाचे संख्याबळ ९ वर आले. त्यामुळे दिवंगत आबांनी काँग्रेसच्या संजय पवार यांना आपल्याकडे वळवून त्यांना नगराध्यक्षपद दिले होते. आबा गटाची सत्ता असली तरी काँग्रेसचा नगराध्यक्ष असे चित्र पालिकेत होते. आबांच्या पश्चात गेल्या दोन महिन्यांपासून नगराध्यक्षांच्या उचलबांगडीसाठी आबा आणि काका गटातून जोरदार हालचाली सुरू होत्या. तथापि अविश्वास ठरावासाठी आवश्यक संख्याबळ दोन्ही गटाकडे नव्हते. त्यातच दोन्ही गटांनी एकत्रित येण्याच्यादृष्टीनेही चाचपणी झाली होती. मात्र राष्ट्रवादीकडून विरोध झाल्यामुळे अविश्वास ठराव बारगळला. गेल्या चार दिवसांत भाजपने सत्ता काबीज करण्यासाठी जोरदार हालचाली केल्या. खासदार संजय पाटील यांनी केलेले नियोजन, त्यांच्या शिलेदारांनी तंतोतंत अमलात आणले.
पहिल्या टप्प्यात आबा गटाच्या तीन नाराज नगरसेवकांना रातोरात भाजपमध्ये प्रवेश दिला गेला. राष्ट्रवादी या धक्क्यातून सावरण्याआधीच दुसऱ्या दिवशी उपनगराध्यक्षांसह आणखी तीन नाराज नगरसेवकांना अविश्वास ठरावाच्या बाजूने काका गटात सामील केले गेले. सोमवारी अविश्वास ठराव दाखल करण्यापूर्वी आबा गटात राहिलेल्या दोन नगरसेवकांपैकी जाफर मुजावर हेही काका गटात सामील झाले आणि १८ नगरसेवकांपैकी १६ जणांनी अविश्वास ठराव दाखल केला. एकेकाळी आबा गटाचे पारडे जड असणाऱ्या नगरपालिकेतील सत्ता पूर्णत: काका गटाकडे आली आहे. खासदार संजयकाका पाटील यांनी राजकीय कसब वापरून पालिकेवर एकहाती सत्ता आणण्यात यश मिळविले आहे. नगराध्यक्ष पवार यांनी रविवारी स्पष्ट केल्याप्रमाणे, सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे राजीनामा सादर केला.
आबा गट काँग्रेसच्या पंगतीत
अविश्वास ठरावानंतर नगरपालिकेत खासदार संजयकाका गटाचे संख्याबळ १६ झाले आहे, तर आबा गटाकडे एकमेव नगरसेवक अमोल शिंदे राहिले आहेत. आबा गटातील तीन नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तर चार नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे नगरपालिकेत संख्याबळाच्यादृष्टीने आबा गट आता काँग्रेसच्या पंगतीत बसला असून, या गटाचे संख्याबळ काँग्रेसएवढेच राहिले आहे.
यांनी दाखल केला अविश्वास...
खासदार समर्थक : अनिल कुत्ते, राजेंद्र म्हेत्रे, बाबासाहेब पाटील, अविनाश पाटील, शिल्पा धोत्रे, शरद मानकर, सिंधू वैद्य, सारिका कांबळे, जयश्री धाबुगडे. ४खासदार गटात प्रवेश केलेले : रजनीगंधा लंगडे, सुशिला साळुंखे, विजया जामदार.
खासदार गटाला पाठिंबा : सुरेश थोरात, अनुराधा पाटील, शुभांगी साळुंखे, जाफर मुजावर.
नगराध्यक्षपदासाठी साळुंखेंचे नाव आघाडीवर
पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे नवे नगराध्यक्ष कोण होणार याची चर्चा सुरू झाली आहे. काका गटात प्रवेश केलेल्या सुशिला साळुंखे, रजनीगंधा लंगडे यांच्यासह काका गटातील काही नावे चर्चेत आहेत. मात्र सुशिला साळुंखे यांचे नाव आघाडीवर आहे.
 

Web Title: Power of Sanjayakak on the Tasgaon Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.