खंडाळा तालुक्यात सत्तासंघर्ष शिगेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:33 AM2021-01-14T04:33:05+5:302021-01-14T04:33:05+5:30

खंडाळा : खंडाळा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय धुराळा उडाला आहे. तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींसाठी गावोगावी विविध पक्षीय ...

Power struggle erupts in Khandala taluka | खंडाळा तालुक्यात सत्तासंघर्ष शिगेला

खंडाळा तालुक्यात सत्तासंघर्ष शिगेला

Next

खंडाळा : खंडाळा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय धुराळा उडाला आहे. तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींसाठी गावोगावी विविध पक्षीय पॅनलअंतर्गत लढती होत आहेत. गावगाड्याचा कारभार हाकण्यासाठी गाव पुढाऱ्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यामुळे गावोगावच्या ग्रामपंचायतीचा सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे.

खंडाळा तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींत ३२० जागांसाठी लढत होत असून, ६९८ उमेदवार मैदानात आहेत. तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायतींवर आजवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य होते. गावोगावी राष्ट्रवादी पूर्ण राजकीय तयारीने उतरली आहे. असे असले तरी या निवडणुकीत राष्ट्रवादी विरोधात विरोधी पक्षही सक्षम झाले आहेत. त्यातच तालुक्यातील जवळपास सर्वच ठिकाणची निवडणूक होत असल्याने गावपुढारी सत्ता काबीज करण्यासाठी सक्रिय झाले आहेत. या ग्रामपंचायतींपैकी अनेक ठिकाणी अटीतटीच्या लढती होत आहेत. काही ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीमधील अंतर्गत मतभेदांमुळे लढत होत आहे.

राष्ट्रवादीच्या विरोधात ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधकांनी कंबर कसली असली तरी गावच्या नेत्यांनी प्रतिष्ठेचा विषय करीत प्रचारात रंगत आणली. काही गावांमध्ये राष्ट्रवादी अंतर्गत गटांनी एकमेकांविरुद्ध दंड थोपटल्याने या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. ग्रामपंचायतीच्या निमित्ताने गटातटात चालणाऱ्या राजकारणाने घराघरात शिरकाव केला आहे.

चौकट :

कोण बाजी मारणार याकडे लक्ष...

मागील काही निवडणुकींत राजकीय घडामोडींमुळे काँग्रेस, भाजपचे नुकसान झाले. हे नुकसान भरून काढण्यासाठी कार्यकर्ते एकवटल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हे पक्ष पुन्हा उभारी घेणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत, तर याउलट गावोगावी राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू आणखी मजबूत करण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी धावपळ सुरू केली आहे. मात्र, नक्की बाजी कोण मारणार हे जनतेचा कौल आल्यानंतरच कळणार आहे.

-----------------------

Web Title: Power struggle erupts in Khandala taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.