प्रतापगडच्या दऱ्याखोऱ्यांत खांद्यावर पोल वाहून वीजपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:41 AM2021-05-27T04:41:49+5:302021-05-27T04:41:49+5:30

सागर गुजर सातारा : तौक्ते वादळामुळे १७ मे रोजी सातारा जिल्ह्यातही हाहाकार माजवला. कोकणाला जवळ असणाऱ्या महाबळेश्वर, जावळी, पाटण ...

Power supply in the valleys of Pratapgad carrying poles on the shoulders | प्रतापगडच्या दऱ्याखोऱ्यांत खांद्यावर पोल वाहून वीजपुरवठा

प्रतापगडच्या दऱ्याखोऱ्यांत खांद्यावर पोल वाहून वीजपुरवठा

Next

सागर गुजर

सातारा : तौक्ते वादळामुळे १७ मे रोजी सातारा जिल्ह्यातही हाहाकार माजवला. कोकणाला जवळ असणाऱ्या महाबळेश्वर, जावळी, पाटण तालुक्‍यांतदेखील मोठा फटका बसला. महाबळेश्वर तालुक्यातील कोंडोशी या गावात विजेचे खांब पडून वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र, वीज वितरण कंपनीने सजगता दाखवून येथील वीजपुरवठा सुरळीत केला.

प्रतापगडपासून ६ किमी अंतरावर कोंडोशी हे छोटेसे गाव आहे. त्याला पोलादपूर (कोकण) ५३ किमीवरून वीजपुरवठा केला जातो. तौक्ते वादळात या गावाला वीजपुरवठा करणाऱ्या उच्चदाब वाहिनीचे आठ पोल व लघुदाब वाहिनीचे आठ पोल पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता.

आता या गावामध्ये जायचे म्हटले तर प्रतापगडापासून दऱ्याखोऱ्यांमध्ये पायवाटेने जावे लागते. गाव अंधारात होते. जंगली पशुपक्ष्यांचा वावर असल्याने किर्र अंधारात घराबाहेर पडणे तसे जिकिरीचे आणि जीवावर बेतणारे असल्याने परिसरातील लोकांची समस्या लक्षात घेऊन वीज वितरण कंपनीने तत्काळ मोहीम हाती घेतली.

मुख्य रस्त्यापर्यंत वाहनाने विजेचे खांब नेता आले. मात्र, तिथून पुढे दुर्गम आणि पायवाट असल्याने पोल लोकांच्या खांद्यावर घेऊनच न्यावे लागणार होते. कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने हे पोल खांद्यावर वाहून नेले. एकमेकांना प्रोत्साहन देत या कर्मचाऱ्यांनी बघता-बघता हे पोल उभे करून विजेच्या ताराही जोडून घेतल्या. वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या कामी लागणा-या पोलची वाहतूक १६ लोकांनी खांद्यावरून केली. आता या परिसरातला वीजपुरवठा सुरळीत झाला आहे.

कोट..

तौक्ते वादळामुळे प्रतापगडच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर वीजखांब कोसळले आणि वीजपुरवठा बंद झाला. याची माहिती मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांची एक टीम त्या भागात पाठवली. योग्य त्या सूचना त्यांना केल्या. कर्मचाऱ्यांनीही मन लावून काम केल्याने या भागातील वीजपुरवठा सुरळीत होऊ शकला.

- गौतम गायकवाड, अधीक्षक अभियंता वीज वितरण

अन् काळवंडलेले चेहरे खुलले..

कोंडोशी हे महाबळेश्वर तालुक्यातील टोकावरचे दऱ्याखोऱ्यांत असणारे गाव. गावात कोणती अडचण निर्माण झाली, तर ती निस्तरताना लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. वीज वितरण कंपनीने जोरदार मोहीम राबवून येथील काम नव्याने उभारले. वीजतारा जोडल्या आणि गावात पुन्हा वीज सुरू झाली. त्यामुळे तेथील लोकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

फोटो ओळ : प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याला कोंडोशी या गावामध्ये वीज वितरण कंपनीने खांद्यावर पोल वाहून वीजपुरवठा सुरळीत केला.

Web Title: Power supply in the valleys of Pratapgad carrying poles on the shoulders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.