पालिकेनं लावलं लोकांना कामाला!
By admin | Published: June 22, 2015 11:02 PM2015-06-22T23:02:01+5:302015-06-22T23:02:01+5:30
सातारा : रस्त्यावर भर टाकण्यासाठी नागरिकांचाच पुढाकार
सातारा : पावसाळ्यापूर्वी कामे मंजूर होऊन देखील नगरसेवकांच्या दुर्लक्षामुळे ती पूर्ण झाली नाहीत. त्याचा फटका मात्र सर्वसामान्यांना बसत आहे. ठिकठिकाणी खड्डे मुजविण्यासाठी खडी आहे; पण काम करणारे मजूर नसल्याने शेवटी नागरिकांनीच हाती पाटी घेऊन भर टाकण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे नागरिकांनाच पालिकेनं लावलं कामाला,’ अशी चर्चा सुरू झाली आहे.सातारा पालिकेने पावसाळापूर्व कामांना मंजुरी दिली आहे. परंतु ही कामे पावसाळा सुरू होऊन देखील रखडली आहेत. येथील जुना मोटार स्टॅण्ड ते सुमित्राराजे व्यापारी संकुल जवळील रस्ता पूर्ण उखडला आहे. तर विविध कामांसाठी खणलेल्या रस्त्यावर भरही टाकली नसल्याने सध्या हा रस्ता पाऊस आणि पाण्याने जलमय झाला आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर पालिकेने मागील आठवड्यात येथे दगड खडी आणून टाकली आहेत. परंतु कामाची सुरुवात मात्र झाली नाही.
दरम्यान, जुना मोटार स्टॅण्ड जवळील या परिसरात सतत वर्दळ असते. त्यामुळे या रस्त्यावरून हजारोंच्या संख्येने नागरिकांची ये-जा असते तर अनेक व्यावसायिक या रस्त्यावर आपला व्यवसाय करत आहेत.
मागील दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाचे पाणी येथील खड्ड्यात मोठ्या प्रमाणात साचले आहे. साचलेल्या पाण्यातून वाहने जाऊन हे पाणी येथील व्यावसायिकांच्या मालावर पडत असून,नुकसान होत आहे. त्यामुळे हे काम लवकरात लवकर करण्याची मागणी नागरिकांनी करूनदेखील पालिका दुर्लक्ष करीत आहे. म्हणून नागरिकांनीच पालिकेने टाकलेली खडी स्वत: उचलून खड्ड्यात टाकण्यास सुरूवात केली आहे.
येथील रस्त्यांवरील खड्यांबाबत संबंधित नगरसेवकांनी वेळीच लक्ष दिले असते तर हे काम वेळेत पूर्ण झाले असते; परंतु नगरसेवकच लक्ष देत नसल्याने पालिकेचे काम आम्हाला करावे लागत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. तसेच नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिय तीव्रपणे मांडून नगरसेवकांबद्दल नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
नगरसेवकांचं दुर्लक्ष...
जुना मोटार स्टॅण्ड, जुनी भाजी मंडई परिसर हा दोन वॉर्डाच्या हद्दीत येत असल्याने पालिकेत मातब्बर समजल्या जाणाऱ्या नगरसेवकांचे या भागात दुर्लक्ष होत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. पावसाळ्यापूवीर्ची मंजूर कामे केली जात नसल्याचा प्रकार येथे पाहायला मिळत आहे. रस्त्यावर खडी-डबर येऊनदेखील केवळ नगरसेवकांच्या दुर्लक्षतेमुळे रस्त्यावरून चालणेही आता मुश्किल झाले आहे.
मागील अनेक वर्षे मी या परिसरात भाजी मंडई व इतर साहित्य खरेदीसाठी येतो. अनेक पावसाळे पाहिले; परंतु हा परिसर सतत खड्ड्याने भरलेला दिसतो. ‘रस्ता कमी अन् खड्डे जास्त,’ अशी या रस्त्यांची खासियत असून, याचा अनुभवही आता वर्षानुवर्षांचा झाला आहे.
- विवेक भोसले, नागरिक (वाहनचालक)