बलाढ्य राष्ट्रवादी काँग्रेसवर आत्मचिंतनाची वेळ!
By Admin | Published: March 3, 2017 11:42 PM2017-03-03T23:42:43+5:302017-03-03T23:42:43+5:30
कोरेगाव दक्षिण : अंतर्गत विरोध कोठेतरी थांबविण्याची गरज; निष्ठावंतांचे मत
साहिल शहा ल्ल कोरेगाव
तालुक्याच्या दक्षिण भागात नेहमीच बलशाली असलेल्या आणि सातत्याने विविध संस्थांवर सत्ता असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पक्षांतर्गत विरोधामुळेच ताकद असून देखील राष्ट्रवादी यश मिळवू शकली नाही, याचे निष्ठावंत कार्यकर्त्यांना शल्य आहे.
पक्षांतर्गत असलेला विरोध कोठेतरी थांबला पाहिजे, अन्यथा पक्षाची अवस्था बिकट होण्याची शक्यता निष्ठावंतांमधून व्यक्त होत आहे. एकूणच कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदार संघाचे बुरुज ढासळू लागले असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसवर आत्मचिंतनाची वेळ आली आहे.
दक्षिण भाग हा नेहमी राष्ट्रवादीची विचारधारा मानणारा विभाग. या विभागातील विविध सत्तास्थानांवर आजवर राष्ट्रवादीची पकड राहिली आहे. पक्षाने आदेश द्यायचा आणि त्याचा निकालच घेऊनच जायचा, अशी आजवर येथे परिस्थिती होती. मात्र, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पक्षानेच पक्षाचा पाडाव का केला, याचे कोडे मात्र निष्ठावंतांना अद्याप उलगडलेले नाही.
रहिमतपूर नगरपालिकेवर कायम सत्ता असलेल्या सुनील माने यांच्याकडे पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा आहे, त्यांनी या निवडणुकीत चांगलेच लक्ष घातले होते. मात्र, विजयाची शक्यता असताना अचानक पक्षाला पराभव स्वीकारावा लागला आहे.
संभाजीराव गायकवाड हे राजकीय धुरंधर नेतृत्व. शांत व संयमी असलेल्या तात्यांना थेट पवारांचा आशीर्वाद असल्याने आजवर त्यांनी राजकीय जीवनात अनेक पदे भूषविली आहेत. त्यांनी या निवडणुकीत उमेदवारीची अपेक्षा केल्यानंतर थेट बारामतीतून त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आणि तेथूनच इच्छुकांमध्ये नाराजीची लाट उसळली. गायकवाड व सुनील माने यांना ही लाट लक्षात आली होती, त्यांनी पक्षाच्या वरिष्ठांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती.
मात्र, वरिष्ठांनी जेवढे लक्ष द्यायला हवे होते, तेवढे न दिल्याने पक्षांतर्गत ताकद एकवटली नाही आणि परिणामी या निवडणुकीत राष्ट्रवादी म्हणावी, अशी आक्रमक झाली नाही. प्रचार यंत्रणेत देखील सुसूत्रता नसल्याने पक्षाचे अस्तित्व म्हणावे असे राहिले नाही.
वाठार किरोली जिल्हा परिषद गटात नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये पक्षाची मोठी ताकद होती. मात्र, अंतर्गत नाराजी दूर झाली नाही, रुसवे-फुगवे निघाले नाहीत आणि लोकप्रतिनिधींनी म्हणावे असे लक्ष केंद्रित केले नाही. त्यामुळे यशाच्या टप्प्यावर असलेल्या राष्ट्रवादीला मोठ्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले.
आजवर कऱ्हाड उत्तर मतदार संघात शिस्तबद्ध आणि पक्षाच्या आदेशाला किंमत देणारी राष्ट्रवादी ऐन निवडणुकीत तोंडघशी पडली असल्याने त्याचा विपरित परिणाम २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दिसून येऊ शकतो, असे निष्ठावंतांचे म्हणणे आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांची वेळीच नाराजी दूर केली असती तर निकाल वेगळा दिसला असता, असेही निष्ठावंतांचे म्हणणे आहे.