शक्तिप्रदर्शनाने दोन्ही राजेंचे अर्ज दाखल; कार्यकर्त्यांचा अलोट उत्साह; ठिकठिकाणी स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 11:40 PM2019-10-01T23:40:44+5:302019-10-01T23:42:05+5:30
उदयनराजे भोसले यांनी जलमंदिरातील भवानीमातेचे दर्शन घेतलं तर आपल्या आई कल्पनाराजे भोसले यांचेही आशीर्वाद घेतले. तर शिवेंद्रसिंहराजेंनी सुरुची वाड्यातील अभयसिंहराजे भोसले आणि मातोश्री अरुणाराजे भोसले यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
सातारा : भाजपतर्फे लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मंगळवारी साताऱ्यामध्ये मोठे शक्तिप्रदर्शन केले. उदयनराजे यांनी लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे तर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघासाठी सातारा प्रांताधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.
दोन्ही राजे निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरणार असल्याने मंगळवारी जलमंदिर व सुरुची या दोन्ही वाड्यांवर कार्यकर्त्यांची सकाळपासूनच मोठी गर्दी झाली होती. राजेंनी सकाळी कुलदैवतांचे दर्शन घेतलं. उदयनराजे भोसले यांनी जलमंदिरातील भवानीमातेचे दर्शन घेतलं तर आपल्या आई कल्पनाराजे भोसले यांचेही आशीर्वाद घेतले. तर शिवेंद्रसिंहराजेंनी सुरुची वाड्यातील अभयसिंहराजे भोसले आणि मातोश्री अरुणाराजे भोसले यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. तसेच अजिंक्यतारा साखर कारखान्यावरील भवानीमातेच्या मंदिरात दर्शनासाठी ते सकाळी गेले. अदालतवड्यामध्ये त्यांचे काका ज्येष्ठ नेते शिवाजीराजे भोसले आणि काकी चंद्रलेखाराजे भोसले यांचे आशीर्वाद घेण्यासाठीही दोघे गेले. निवासस्थानी परतल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचे अलोट उत्साहात स्वागत केले.
राजवाड्यासमोरील गांधी मैदानावर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. या ठिकाणी दोन्ही राजेंचे आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. गोल बागेतील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले (थोरले) यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीमध्ये कार्यकर्ते राजेंच्या नावाचा जयघोष करत होते. मोती चौकातून ही रॅली देवी चौकाकडे गेली. तिथून कमानी हौदमार्गे शेटे चौक व तिथून पोलीस अधीक्षक कार्यालयामार्गे ती नाक्यावर गेली. या ठिकाणी दोघांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले.
तिथून ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेली. लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उदयनराजे भोसले यांच्यासोबत शिवेंद्रसिंहराजे भोसले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, क-हाड दक्षिणचे नेते डॉ. अतुल भोसले, शेखर चरेगावकर, मदन भोसले, भरत पाटील, सुवर्णा पाटील, शंकर माळवदे आदींची उपस्थिती होती. प्रांताधिकारी कार्यालयात शिवेंद्रसिंहराजेंचा अर्ज भरताना वेदांतिकाराजे भोसले यांच्यासह सर्व मंडळी उपस्थित होती.
शिवेंद्रसिंहराजेंना आणायला उदयनराजे गेले
अदालतवाड्यातून दोघेही पुन्हा आपल्या निवासस्थानी परतले. त्यानंतर गांधी मैदानापासून भव्य रॅली काढण्यात येणार होती. उदयनराजे स्वत: आपली गाडी घेऊन सुरुचीवर गेले. शिवेंद्र्रसिंहराजे यांना आपल्या गाडीत बसवून ते गांधी मैदानावर आले.
फडणवीसांचा उदयनराजेंना फोन
उदयनराजे भोसले यांनी लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर पडत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मोबाईलवर फोन केला. पाटील यांनी आपला फोन उदयनराजेंकडे दिला. मुख्यमंत्र्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उदयनराजेंना फोनवरून शुभेच्छा दिल्या.
आजी-माजी नगरसेवकांची हजेरी
निवडणुकीत कधी काळी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले व ज्यांच्यातून साधा विस्तवही जात नाही, असे आजी-माजी नगरसेवक या रॅलीच्या निमित्ताने एकत्र आले. एकमेकांची विचारपूस न करणारे नगरसेवकहीगप्पा मारताना दिसून आले. कमळाचे चिन्ह असलेल्या टोप्या, मफलर तसेच झेंड्यांचे समर्थकांना वाटप करण्यात आले. भाजपप्रेमींनी रॅलीत सहभाग घेतला.
कंदी पेढ्यांचा अभिषेक
उदयनराजे भोसले यांनी लोकसभेसाठी व शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभेसाठी प्रथमच एकत्र अन् एकाच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना दोन्ही राजेंकडून मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. गांधी मैदानातून निघालेली रॅली कमानी हौदाकडे मार्गस्थ झाली. यावेळी एका समर्थकाने चक्क दोन्ही राजेंना कंदी पेढ्यांचा अभिषेक घातला. साताऱ्यातील राजकारणाच्या इतिहासात अशा प्रकारे अभिषेक घालण्याची बहुदा ही पहिलीच वेळ असावी.