सातारा जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात ‘प्रहार’ विधानसभा निवडणूक लढविणार, बच्चू कडू यांनी केली घोषणा
By नितीन काळेल | Published: October 16, 2023 03:56 PM2023-10-16T15:56:42+5:302023-10-16T15:57:19+5:30
शासन शेतकऱ्यांना सक्षम करण्यास अपयशी ठरले
सातारा : दिव्यांग बांधवांशी आमची बांधिलकी आहे. त्यामुळे कोणतीही युती मी मानत नाही. त्यामुळे माण विधानसभा मतदारसंघाची निवडणूक प्रहार संघटना लढविणार आहे, अशी घोषणा दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष व प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी केली. तसेच शासन शेतकऱ्यांना सक्षम करण्यास अपयशी ठरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आरक्षण द्या, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सातारा येथे दिव्यांग आपल्या दारी अभियानासाठी आल्यावर बच्चू कडू यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि दिव्यांग बांधव उपस्थित होते.
बच्चू कडू म्हणाले, दिव्यांग आपल्या दारी अभियानाचा साताऱ्यातील कॅम्प चांगला ठरला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाबाबत तक्रारी असल्यातरी जिल्हाधिकाऱ्यांचे काम चांगले आहे. दिव्यांगांच्या बाबतीत काही निर्णय बदलणे गरजेचे आहे. त्याशिवाय दिव्यांग बांधवांना लाभ मिळणार नाही. या अभियानात सातारा जिल्हा राज्यात आदर्श ठरेल अशी अपेक्षा आहे. यासाठी मी दोन महिन्यातून एकदा येथे येणार आहे. आता दिव्यांगांच्या अडचणीचे काय धोरण आहे ते ठरवून त्यासाठी चांगल्या निर्णयाचे तोरण बांधणार आहे. यापुढे दिव्यांगाकडे दुर्लक्ष केल्यास निवडणुकीत याचे उत्तर संबंधितांना मिळणार आहे. कारण, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दिव्यांगाची संख्या मोठी आहे.
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावर पत्रकारांनी बोलते केल्यावर मला मंत्रीपद नको आहे, असे त्यांनी पुन्हा स्पष्टपणे सांगितले. तसेच प्रहार संघटना राज्यात १५ ठिकाणी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचा प्रश्न पत्रकारांनी केल्यावर कडू यांनी सातारा जिल्ह्यातही निवडणूक लढविणार आहे. यासाठी माण-खटाव मतदारसंघात प्रहारचा उमेदवार १२० टक्के असेल असे सांगितले. तर यावर त्यांना तुम्ही युतीत असताना माण मतदारसंघाबाबत असा निर्णय घेणार का ? असा प्रश्न केल्यावर त्यांनी मी युती मानत नाही, असे निक्षून सांगितले.
त्याचबरोबर राज्यातील आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांनी कोणतेही सरकार शेतकऱ्यांना देण्यास अपयशी ठरले आहे. त्यामुळे आरक्षणासारखे मुद्दे पुढे येत आहेत असे सांगतानाच लोकसंख्येत शेतकऱ्यांचा वाटा किती ? त्याप्रमाणात राज्य आणि केंद्र शासनाने शेतकऱ्यांना वाटा द्यावा. तसेच शेतकऱ्याला आऱ्थिक आरक्षण द्यायला हवे, असेही स्पष्ट केले.
दिव्यांग बांधवांच्या निवेदनाचा स्वीकार...
कार्यक्रम संपल्यानंतर बच्चू कडू हे सभागृहात प्रत्येक दिव्यांगापुढे जाऊन त्यांचे निवेदन घेत होते. खुर्चीवर बसलेला दिव्यांग बांधव आणि त्यांच्या बरोबरबरीने आलेले नातेवाईक हे बच्चू कडु यांना माहिती द्यायचे. त्याप्रमाणे कडू निवेदन घेऊन जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांना सूचना करत होते. जवळपास अडीच तास कडू यांनी दिव्यांग बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या.