जिल्हा बँकेत कौतुक अन् विश्रामगृहात आव्हान !

By admin | Published: February 15, 2015 12:57 AM2015-02-15T00:57:17+5:302015-02-15T00:57:40+5:30

सहकारमंत्र्यांच्या दोन भूमिका : युतीतील वादावर शिवतारेंशी चर्चा करणार

Praise the District Bank and challenge the rest house! | जिल्हा बँकेत कौतुक अन् विश्रामगृहात आव्हान !

जिल्हा बँकेत कौतुक अन् विश्रामगृहात आव्हान !

Next

सातारा : राज्याचे सार्वजनिक बांधकाम, सहकार व वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेला भेट देऊन बँकेच्या कामकाजाचे तोंड भरून कौतुक केले; परंतु त्यानंतर शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत ‘बँकेच्या निवडणुकीत भाजपचेही पॅनेल असू शकते ,’ असे सांगून त्यांनी एकप्रकारे आव्हानच दिले.
चंद्रकांत पाटील शनिवारी जिल्हा दौऱ्यावर होते. सकाळी त्यांनी मध्यवर्ती बँकेत बैठक घेतली. बँकेचे अध्यक्ष व माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, माजी पालकमंत्री रामराजे नाईक-निंबाळकर, शशिकांत शिंदे, विलासराव पाटील-उंडाळकर, दादाराजे खर्डेकर यांच्यासह पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बँकेच्या कामकाजाचे कौतुकही केले.
‘राज्यातील ३५ पैकी २0 जिल्हा मध्यवर्ती बँका अवसायनात आल्या. सातारा जिल्हा बँक उत्तमरीत्या चालली आहे. विविध पुरस्कारही मिळाले आहेत. या बँकेच्या व्यवहारांमध्ये राजकीय हस्तक्षेप नाही. त्यामुळे बँक चांगली राहिली आहे,’ असे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.
त्यानंतर शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारले की, ‘जिल्हा बँकेचे तुम्ही एवढे कौतुक करत आहात. तेव्हा या बँकेच्या आगामी निवडणुकीतून भाजप अलिप्त राहणार की काय ?’ मंत्री पाटील यांनी सांगितले की, ‘सहकारमंत्री आणि एका पक्षाचा नेता, हे माझे दोन वेगवेगळे रोल आहेत. माझ्याकडे संपूर्ण राज्याचे सहकार खाते आहे. एका पक्षाचा नेता म्हणून माझी भूमिका वेगळी असेल. वरिष्ठ पातळीवर निर्णय झाल्यास बँकेच्या निवडणुकीत भाजपचेही पॅनेल असू शकते.’ तसेच ‘नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान या नात्याने बारामतीत गेले आहेत. यातून राष्ट्रवादीशी जवळीक साधण्याचा कोणताही हेतू नाही,’ असेही त्यांनी यावेळी पत्रकारांसमोर स्पष्ट केले. भाजप-शिवसेनेतील खटका-खटकीबाबत विचारले असता पाटील यांनी ‘दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारी सारख्याच आहेत. याबाबत मी स्वत: पालकमंत्री विजय शिवतारे यांच्याशी बोलून हा वाद मिटवेन,’ असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
रयत कारखान्याला जप्तीची नोटीस
सातारा जिल्ह्यातील अजिंक्यतारा व किसन वीर या दोन साखर कारखान्यांनी एफआरपी नियमाप्रमाणे शेतकऱ्यांच्या उसाला दर दिला आहे. रयत साखर कारखान्याला जप्तीची नोटीस धाडण्यात आली आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

 

Web Title: Praise the District Bank and challenge the rest house!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.