प्रकाश आंबेडकर यांनी महायुतीत यावे, अन्यथा..; केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा सल्ला
By दीपक देशमुख | Published: February 5, 2024 12:19 PM2024-02-05T12:19:01+5:302024-02-05T12:19:19+5:30
'ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा महाविकास आघाडीकडून सातत्याने अपमान'
सातारा : वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक व दलित समाजाचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा महाविकास आघाडीकडून सातत्याने अपमान हाेत आहे. ते महाविकास आघाडीत जाणार असल्याचे सांगत असले तरी आघाडीकडून त्यांच्याबाबत कोणताही निर्णय होत नाही. यामुळे त्यांनी महाविकास आघाडीत न जाता महायुतीत यावे अन्यथा स्वतंत्रपणे लढावे, असा सल्ला रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला.
सांगली दौऱ्यावर जात असताना रामदास आठवले यांनी सातारा शासकीय विश्रामगृहावर काहीकाळ थांबून कार्यकर्त्यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी रामदास आठवले म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीमध्ये दलित, ओबीसी तसेच सर्व समाज घटकांना न्याय दिला जात आहे. महाहायुतीमध्ये रिपाइंचा सन्मान राखला जात असून लोकसभेमध्ये एकही सदस्य नसताना मला मंत्रीपदाची संधी दिली आहे.
तथापि, आगामी लोकसभेला महाराष्ट्रात दोन जागा रिपाइंला मिळाव्यात, अशी अपेक्षा आहे. जागावाटपाच्या चर्चेवेळी आमची बाजू सर्व नेत्यांसोबत मांडणार आहे. रिपाइंचा मतदार गावा-गावांत आहे. दलित समाजाची मते महायुतीकडे वळवण्याच्या दृष्टीने महायुतीच्या नेत्यांनी विचार करावा. मला जरी मंत्रीपद मिळाले तरी माझ्या पक्षातील कार्यकर्त्यांनाही सत्तेमध्ये वाटा मिळावा. जिल्हा नियोजन समितीवर व इतर महामंडळांमध्ये लवकरात लवकर नियुक्त रिपाइंच्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी. तसेच शिवसेनेतील आमदार अपात्रतेचेचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. मात्र, याचा निर्णय झाला असल्यामुळे आता झाल्यानंतर लवकरात लवकर मंत्रीमंडळाचा विस्तार करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कल्याण येथे पोलीस ठाण्यात भाजप आमदाराकडून झालेल्या गोळीबाराबाबत आठवले म्हणाले, या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जबाबदार धरण्याची काहीच आवश्यकता नाही. हा प्रकार जमिनीच्या वादातून झाला आहे. पोलीस ठाण्यात गोळीबार होणे ही गंभीर प्रकार असला तरी याबाबत पोलीस प्रशासन आपली कारवाई करत आहे.