दैव बलवत्तर म्हणून वाचले प्राण...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:27 AM2021-06-18T04:27:29+5:302021-06-18T04:27:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाई : वाईहून पाचगणीला जाणारी कार पसरणी घाटातील सोळा नंबर स्टॉपजवळ चालकाच्या लक्षात वळण न आल्यामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाई : वाईहून पाचगणीला जाणारी कार पसरणी घाटातील सोळा नंबर स्टॉपजवळ चालकाच्या लक्षात वळण न आल्यामुळे संरक्षक कठड्यावरून दरीत गेली, पण काही फूट अंतरावर कोसळताना झाडाला अडकली. यामुळे नशीब बलवत्तर म्हणून कारमधील तिघेजण वाचले.
याबाबत माहिती अशी की, पुण्याहून पाचगणीला राहण्यासाठी कुलीन ठक्कर व त्यांचे कुटुंबीय आलेले होते. काही कामानिमित्त ते वाईला आले होते. वाईतील कामे संपवून पसरणी घाटातून पाचगणीला जात असताना सोळा नंबर स्टॉपजवळ त्यांची कार संरक्षक कठड्यावर चढून दरीच्या बाजूला घुसली. काही फूट अंतरावर ती असणाऱ्या झाडात अडकली. यामुळे एक पुरुष व दोन महिलांचे प्राण वाचले.
पसरणी घाटातून पाचगणीकडे जात असताना मुसळधार पाऊस आणि घाटातील धुक्यामुळे वाहन चालकाला रस्त्यावरील वळण लक्षात आले नाही. त्यामुळे कार रस्त्यावरील संरक्षक कठड्यावर चढून दरीत घुसली. यामध्ये कारचे किरकोळ नुकसान झाले. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. अपघाताची माहिती मिळताच वाई पोलिसांनी तत्काळ पसरणी घाटात धाव घेतली. क्रेनच्या साहाय्याने कार बाहेर काढण्यात आली. अपघाताची नोंद वाई पोलीस ठाण्यात झाली आहे.
फोटो दि. वाई कार फोटो...
फोटो ओळ : पसरणी घाटात वळण लक्षात न आल्याने कार संरक्षक कठड्यावरून दरीच्या बाजूला वळली. झाडांना अकडल्यामुळे आतील तिघेजण बचावले. (छाया : पांडुरंग भिलारे)