ही दोस्ती तुटायची नाय; दोघांनी केला एकच निर्धार अन् झाले इंडियन नेव्हीत भरती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 06:03 PM2022-02-22T18:03:10+5:302022-02-22T18:04:48+5:30
जीवनाच्या प्रत्येक वळणावर प्रणय व अमरचीही जीवलग मैत्री असताना नोकरीतही ही मैत्री अशीच अखंड राहील, असं स्वप्नातही वाटत नव्हतं; पण घडलं तसंच
सातारा : ही दोस्ती तुटायची नाय... असं म्हणत पाचवीपासून एकत्र शिक्षण घेत बारावी उत्तीर्ण झाल्यानंतरही दोघांनी एकाच मार्गावर चालण्याचा निर्धार केला आणि विशेष म्हणजे शैक्षणिक आयुष्यानंतरही हे जीवलग मित्र नोकरीतील आयुष्यही एकत्रित घालवणार असल्याचे निश्चित झालं आहे. प्रणय जितेंद्र जिमन (रा. जावळेवाडी, ता. जावळी) व अमर प्रभाकर दुदुस्कर (रा. दुदुस्करवाडी, ता. जावळी) अशी या जीवलग मित्रांची नावे आहेत.
प्रणय व अमरची इंडियन नेव्हीमध्ये एसएसआर पदावर निवड झाली आहे. ओरिसा येथे झालेल्या परीक्षेत दोघांनीही घवघवीत यश मिळवले. प्रणय व अमर या दोघांनी पवारवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पाचवी इयत्तेत प्रवेश घेतला. त्याअगोदर त्यांची इतकीशी ओळख नव्हती; परंतु त्यानंतर त्या दोघांचे विचार अन् मने जुळली आणि एकाच बेंचवरचा शैक्षणिक प्रवास सुरू झाला.
तशी दोघंही हुशार... कधी प्रणयचा पहिला क्रमांक तर कधी कधी अमरही त्याला क्रॉस करायचा; पण ही स्पर्धा निकोप होती. या स्पर्धेमुळे दोघांच्याही गुणवत्तेत वाढच होत गेली. दहावीतही दोघांनी उत्कृष्ट यश मिळवले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणाचा टप्पा सुरू झाला. या प्रवासातही अनपेक्षितपणे दोघे एकाच कॉलेजमध्ये म्हणजे यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजमध्येच प्रविष्ट झाली आणि तिथेही त्यांची मैत्री आणखी घट्ट झाली.
जीवनाच्या प्रत्येक वळणावर प्रणय व अमरचीही जीवलग मैत्री असताना नोकरीतही ही मैत्री अशीच अखंड राहील, असं स्वप्नातही वाटत नव्हतं; पण घडलं तसंच... इंडियन नेव्हीच्या एसएसआर पदासाठी दोघांनीही तयारी सुरू केली होती. विशेष म्हणजे तयारी सुरू केल्याचे दोघांनीही एकमेकांना सांगितलेले नव्हते.
जावळेवाडी, दुदुस्करवाडी, पवारवाडी, सायगाव पंचक्रोशीतील नागरिक, नातेवाईक, मित्रपरिवार यासह पवारवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षक वर्गाकडून या दोघांचे कौतुक होत आहे.
ओरिसात परीक्षेच्या ठिकाणी झाली पुन्हा भेट..
नेवीची परीक्षा ओरिसा येथे होती. त्यावेळी दोघांची पुन्हा भेट झाली आणि याही वेळेला दोस्ती रंग लायी.... प्रणय जिमन व अमर दुदुस्कर दोघांचीही या पदासाठी निवड झाली. इथून पुढे प्रशिक्षणाचा कालावधीही दोघं एक साथ घालविणार आहेत. या सर्व घटनाक्रमावरून दोघांच्या घट्ट मैत्रीचा अनुभव येत आहे.