पादचाऱ्यांच्या डोक्यात नारळाचा ‘प्रसाद’

By admin | Published: March 30, 2015 10:48 PM2015-03-30T22:48:15+5:302015-03-31T00:20:47+5:30

अचानक फुटतायत डोकी : मलकापूरला मुख्य रस्त्यावरील झाडे बनली धोकादायक; नारळ पडल्याने अनेकांना दुखापत; वाहनांचेही नुकसान

Prasad of coconut in the head of pedestrians | पादचाऱ्यांच्या डोक्यात नारळाचा ‘प्रसाद’

पादचाऱ्यांच्या डोक्यात नारळाचा ‘प्रसाद’

Next

माणिक डोंगरे - मलकापूर- शहराच्या मुख्य रस्त्यालगतची नारळाची झाडे दिवसेंदिवस धोकादायक बनत आहेत. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांच्या डोक्यात नारळ व फांद्या पडल्याने दहा ते अकरा जण किरकोळ जखमी झाले, तर अनेक वाहनांची मोडतोड झाली आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यावरून ये-जा करताना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे.
शहरातील मलकापूर फाटा ते आहिल्यादेवी चौक या मुख्य रस्त्यालगत नारळाची झाडे आहेत. या झाडांची उंची व विस्तार वाढल्याने झाडाला नारळही मोठ्या प्रमाणावर लागतात. मात्र नारळाची पक्व झालेली फळे अनेक महिन्यांपासून काढलेली नाहीत. ही फळे वाऱ्याची झुळूक जरी आली तरी खाली पडतात. अशा वेळेला रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालक किंंवा पादचाऱ्यांना नारळाचा चांगलाच प्रसाद मिळत आहे. गेल्या तीन महिन्यांत दहा ते अकरा नागरिक येथे जखमी झाले आहेत. तर झाडाच्या सावलीला उभ्या केलेल्या काही वाहनांवर नारळ व फांद्या पडल्याने अनेक वाहनांचे नुकसानही झाले आहे. सार्वजनिक ठिकाणी असलेल्या झाडांचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे नगरपंचायत व वनविभागाने या धोकादायक झाडांच्या बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. त्याच पद्धतीने नगरपंचायत कार्यालय ते शिवाजी चौक दरम्यानच्या रस्त्यालगतची नीलगिरीची काही झाडेही अती विस्तारामुळे धोकादायक बनली आहेत.
पावसाळ्यापूर्वी येणाऱ्या वादळी वाऱ्यात नीलगिरीची झाडे मोडून पडण्याची परिस्थिती होते. जोराच्या वाऱ्यामुळे या झाडांचा आवाजही मोठा होता. तसेच झाडांची उंची जास्त असल्याने वादळी वारे सुरू असताना नागरिक या झाडांकडे फिरकतही नाहीत. दररोज सुटणाऱ्या वाऱ्यानेही ही झाडे डोलतात. त्यामुळे नागरिकांच्या जीवाचा थरकाप उडतो.


कुणीही या, नारळ न्या!
मलकापुरात रस्त्याकडेला नारळाची दहा-पंधरा झाडे आहेत. यांना नारळही मोठ्या प्रमाणात असतात. ज्यावेळी हे नारळ वाऱ्याने पडतात त्यावेळी रस्त्यावरून ये-जा करणारे कोणीही ते नारळ घेऊन जातात. मात्र, या झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही.


डोकं कठीण की नारळ ?
काहीजण डोक्याने नारळ फोडण्याचे कसब दाखवितात. त्यामुळे डोकं कठीण की नारळ, असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पक्त झालेल्या नारळाचे कवच मानवी कवठीपेक्षाही कडक असते. अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. कमलाकर गुरसाळे सांगतात की, ‘डोक्याने नारळ फोडणे ही कला आहे. त्यातून आपली कवठी कठीण आहे, हे सिद्ध होत नाही. नारळ उंचावरून डोक्यावर पडल्यास दुखापत होणार, हे निश्चित. नारळ तीस ते चाळीस फूट उंचावरून अंगावर पडला तर फ्रॅक्चरही होऊ शकते.’


नगरपंचायत पाहतेय तक्रारीची वाट
रस्त्याकडेच्या झाडावरून डोक्यात नारळ पडत असल्याच्या घटना वारंवार घडतायत; पण नगरपंचायतीला याची खबरही नसावी, ही आश्चर्यकारक बाब आहे. रस्त्याकडेची संबंधित झाडे नगरपंचायतीच्या अखत्यारित येतात. मात्र, एकानेही नारळ डोक्यात पडल्याची लेखी तक्रार आमच्याकडे केली नसल्याचे मुख्याधिकारी राजेंद्र तेली यांचे म्हणणे आहे. तसेच थेट झाडे तोडण्यापेक्षा त्याची निगा राखण्याच्या दृष्टीने नगरपंचायतीमार्फत कार्यवाही करू, असेही तेली म्हणाले.


वृक्ष समिती कागदोपत्री
नगरपंचायत किंवा नगरपालिका हद्दीत येणाऱ्या वृक्षांचे संवर्धन करणे, नवीन वृक्ष लावणे किंवा धोकादायक झाडांबाबत निर्णय घेण्यासाठी ‘वृक्ष समिती’ असते; पण मलकापूर नगरपंचायतीत ही समिती कागदोपत्रीच आहे.

सत्काराचाही खर्च वाचेल
मलकापूर नगरपंचायतीने वेळोवेळी झाडांचे नारळ तोडले तर त्या नारळांचा नगरपंचायतीलाही उपयोग होणार आहे. पंचायतीत होणाऱ्या कार्यक्रमावेळी सत्कार समारंभासाठी नगरपंचायत हे नारळ वापरू शकते. त्यातून नारळावर होणारा खर्च तरी वाचेल.

Web Title: Prasad of coconut in the head of pedestrians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.