प्रसाद म्हणुनी पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:35 AM2021-07-26T04:35:37+5:302021-07-26T04:35:37+5:30
रामापूर : कोणी स्वप्नातही पाहिलं नव्हतं असं आक्रीत घडलं अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं. डोंगराची कडा कोसळली अन् अख्खी ...
रामापूर : कोणी स्वप्नातही पाहिलं नव्हतं असं आक्रीत घडलं अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं. डोंगराची कडा कोसळली अन् अख्खी वस्ती मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. ढिगाऱ्याखालून एक-एक मृतदेह बाहेर काढला जात होता अन् नातेवाइकांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकत होता. पाटण तालुक्यातील आंबेघर (खालचे) येथील ही हृदयद्रावक घटना मन सुन्न करणारी होती.
सातारा जिल्ह्याला यंदा अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. वाई, व पाटण तालुक्यांत दरडी कोसळल्याने अनेक घरे मातीखाली गाडली गेली. या घटनेत कोणी आपली आई गमावली, तर कोणी वडील, कोणी आपलं लेकरू गमावलं, तर कोणी आपलं अख्खं कुटुंबच. निसर्गाने शेकडो कुटुंबांचा निवारा हिसकावला शिवाय कधीही भरून न येणारे नुकसानही केले. पाटण तालुक्यात गुरुवारी (दि. २२) रात्री आंबेघर (खालचे) येथे झालेल्या भूस्खलनात पंधरा लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले.
ही घटना उघडकीस आल्यानंतर व बचावपथक घटनास्थळी पोहोचल्यानंतर शनिवारपासून बचावकार्याला गती आली. एनडीआरएफचे जवान व ग्रामस्थांनी संकटांशी चार हात करत सुुरुवातीला ११ मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढले, तर शनिवारी आणखी ३ मृतदेह आढळून आले. मृतदेह बाहेर काढताच नातेवाइकांच्या अश्रूंना बांध फुटत होता. हे विदारक चित्र पाहून उपस्थितांची मनेही हेलावून गेली. ‘निसर्गानं आमचा संंसार मोडून पाडला. कुटुंबं उद्ध्वस्त केली. आता आमच्याकडे अश्रूंशिवाय दुसरं काहीच उरलं नाही,’ अशा भावना कुटुंबीय व्यक्त करीत होते. आंबेघर दुर्घटनेत आजवर १४ ग्रामस्थांचे मृतदेह आढळून आले असले तरी अजूनही ९ महिन्यांच्या बाळाचा शोध काही लागलेला नाही. जागेवरच शवविच्छेदन करून मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
(चौकट)
ग्रामस्थांचे सांत्वन...
पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, माजी सभापती सत्यजितसिंह पाटणकर, जिल्हाधिकारी शेखर सिंह, तहसीलदार योगेश टाम्पे, गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांनी आंबेघरला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला, तसेच ग्रामस्थांचे सांत्वनही केले. पाटण शहरासह ठिकठिकाणचे तरुण ग्रामस्थांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.
फोटो : २५ रामापूर