‘प्रतापगड’मध्ये मनमानी ‘शिंदे’शाही!
By Admin | Published: September 21, 2015 11:33 PM2015-09-21T23:33:30+5:302015-09-21T23:57:00+5:30
बचाव समितीची टीका : संचालकांनी दिला सामूहिक राजीनामा देण्याचा इशारा
कुडाळ : प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत योगदान देऊन तसेच राष्ट्रवादीशी एकनिष्ठ राहूनही केवळ दोन शिंदेंच्या वादात राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष व कारखान्याचे विद्यमान संचालक तानाजी शिर्के यांचा राजकीय सूडबुद्धीने विद्यमान चेअरमन सुनेत्रा शिंदे यांनी राजीनामा मंजूर केला आहे. त्यामुळे शिर्के यांच्याबरोबर आम्हीही बचाव समितीचे सात संचालक यापुढे त्यांच्या मनमानीला विरोध करु अथवा राजीनामे देवू, त्यांनीही १४ संचालकांचे राजीनामे घेऊन पुन्हा निवडणुकीस सामोरे जावे, असा इशारा बचाव समितीचे संचालकांनी आज पत्रकार परिषदेत दिला.प्रतापगड कारखाना निवडणुकीत एकमेव निवडणुकीस सामोरे जावून निवडून आलेल्या तानाजी शिर्के यांच्या संचालकपदाच्या राजीनामा मंजुरीचा मुद्दा चांगलाच गाजला आहे. तर त्यानिमित्ताने आमदार शशिकांत शिंदे यांचा तालुक्यातील राजकीय गोष्टींमध्ये कसा हस्तक्षेप चालू आहे हेदेखील यानिमित्ताने समोर आहे. विद्यमान चेअरमन सुनेत्रा शिंदे, सौरभ शिंदे यांच्या मनमानी कारभाराचा पाढाच सात संचालकांनी वाचला.यावेळी तानाजी शिर्के म्हणाले, विद्यमान चेअरमन पुण्यातून राजकारण करताना आपल्याभोवती जो गोतावळा जमवला आहे त्यांचेच काम करीत आहेत. त्यांच्या चुकीच्या राजकारणामुळेच त्यांना कुडाळ ग्रामपंचायतीची सत्ता मिळवता आली नाही. कारखाना अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवेळी मी. आ. शिंदेशी चर्चा करुन निर्णय घ्या, असं सांगितले असे सांगून शिर्के म्हणाले, या मायलेकरांचा दगडाखालून हात निसटल्याने त्यांनी आ. शिंदे यांनाही कोलदांडा लावला.तर यावेळी बचाव समितीचे निमंत्रक व विद्यमान संचालक मालोजीराव शिंदे म्हणाले, आम्ही सात संचालक आमदार शिंदेंमुळे नव्हे तर बचाव समितीने वेळोवेळी घेतलेल्या योग्य भूमिकेमुळे कारखान्यावर निवडून गेलो आहोत. तर आमदार शिंदे यांच्याच राजकीय खेळीमुळे तानाजी शिर्के यांचा राजीनामा मंजूर केला गेला आहे. त्यामुळे आ. शिंदे हे तालुक्याच्या राजकारणात हस्तक्षेप करुन फोडाफोडीचे राजकारण करीत आहेत, असा आरोप मालोजी शिंदे यांनी यावेळी केला तर आम्ही सातजण एकत्र राहून चेअरमन शिंदे यांच्या मनमानीवर अंकुश ठेवणार.पत्रकार परिषदेस कारखाना संचालक प्रकाश भोसले, प्रदीप तरडे, संजय निकम, रामदास पार्टे, तानाजी शिर्के, मालोजी शिंदे, सभापती सुहास गिरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
हिम्मत असेल तर निवडून येवून दाखवा
पुण्यात राहून प्रतापगड कारखाना चालवणाऱ्या अध्यक्षा सुनेत्रा शिंदे, पुत्र सौरभ शिंदे यांनी माझ्यासारखा राजीनामा देण्याचे धाडस दाखवून पुन्हा निवडणूक रिंगणात उतरवावे व निवडून येवून दाखवून आपले नेतृत्व सिद्ध करावे, असे सरळ आव्हानच संचालक तानाजी शिर्के यांनी सुनेत्रा शिंदे, सौरभ यांना यावेळी दिले.