Satara: प्रतापगड कारखान्याची पहिली उचल ठरली; २८५० मिळणार
By नितीन काळेल | Published: November 30, 2023 06:25 PM2023-11-30T18:25:24+5:302023-11-30T18:25:43+5:30
शिवेंद्रसिंहराजेंकडून दर जाहीर : सर्वांच्या सहकार्यातून हंगाम यशस्वी करणार
सातारा : जावळी तालुक्यातील प्रतापगड सहकारी साखर कारखाना गळीतास आलेल्या उसाला पहिली उचल प्रति टन २ हजार ८५० रुपये देणार असल्याचे अजिंक्यतारा- प्रतापगड साखर उद्योग समुहाचे मार्गदर्शक, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जाहीर केले. तसेच सर्वांच्या सहकार्याने हंगाम यशस्वी करणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
याबाबत प्रसिध्दीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जावळी तालुक्यातील एकमेव सहकारी साखर कारखाना असलेला प्रतापगड कारखाना गेल्या ५ वर्षांपासून बंद अवस्थेत होता. ही सहकारी संस्था पुन्हा उभी रहावी आणि तालुक्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचवावे यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी पुढाकार घेतला. अजिंक्यतारा-प्रतापगड उद्योगाची स्थापना करून अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या मदतीने प्रतापगड कारखाना सुरू केला. प्रतापगड कारखान्याचा हा पहिलाच गळीत हंगाम सुरू आहे. हा हंगाम यशस्वी होण्यासाठी आणि प्रतापगड कारखाना खऱ्या अर्थाने उभा राहावा यासाठी सर्वांचे सहकार्य लाभत आहे.
आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष सौरभ शिंदे आणि संचालक मंडळाकडून नियोजनबद्ध आणि काटकसरीचे धोरण राबवून कारखाना चालवला जात आहे. हा पहिलाच हंगाम असून कारखान्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरीही सध्याच्या आर्थिक नियोजनानुसार प्रतापगड कारखाना गाळपास आलेल्या उसाला प्रतिटन २ हजार ८५० रुपये पहिली उचल देणार आहे.
दरम्यान, कारखाना सर्वांच्या सहकार्याने जोमाने सुरू आहे. रिकव्हरीनुसार पुढील आर्थिक नियोजन केले जाईल. तसेच हंगाम यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सहकार्य कायम ठेवावे, असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी केले आहे.