सातारा : प्रतापसिंह फार्मला अर्ध्या कोटींचे कंपाऊंड!, लवकरच काम सुरू : जिल्हा परिषदेचे पाऊल; लोकमतच्या वृत्ताची दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 11:59 AM2017-12-26T11:59:08+5:302017-12-26T12:04:36+5:30
सातारा जिल्हा परिषदेने राधिका रस्त्यावरील प्रतापसिंह शेती उद्यानाची डागडुजी करण्याचे काम हाती घेतले आहे. लोकमतच्या वृत्ताची दखल घेऊन पहिल्या टप्प्यात या संपूर्ण जागेला कंपाऊंड बांधण्यात येणार असून, त्यासाठी जिल्हा परिषदेने तब्बल ५४ लाख ३७ हजार रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली.
सातारा : जिल्हा परिषदेने राधिका रस्त्यावरील प्रतापसिंह शेती उद्यानाची डागडुजी करण्याचे काम हाती घेतले आहे.
लोकमतच्या वृत्ताची दखल घेऊन पहिल्या टप्प्यात या संपूर्ण जागेला कंपाऊंड बांधण्यात येणार असून, त्यासाठी जिल्हा परिषदेने तब्बल ५४ लाख ३७ हजार रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील सूत्रांनी दिली.
शेतकऱ्यांना शेतातील विविध प्रयोग करण्यासाठी राधिका रस्त्यावर प्रतापसिंह शेती फार्मची निर्मिती करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांत येथे तळीरामांचा वावर वाढला आहे. दिवसाढवळ्या या फार्ममध्ये चकण्यासह तळीराम ठाण मांडून बसत असल्याचे धक्कादायक चित्र पाहायला मिळते.
येथील राधिका रोड मार्गावर जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असणाऱ्या आणि काही एकरांत विस्तारलेल्या प्रतापसिंह शेती फार्ममध्ये शासनाच्या विविध योजनांतर्गत शेतीतील विविध प्रयोग केले जातात.
सक्रियपणे येथे गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प, शेळीपालन प्रकल्प आदी प्रकल्प येथे सुरू आहेत. मात्र, पूर्वीइतका सामान्यांचा राबता या फार्मकडे दिसत नाही.
प्रतापसिंह शेती फार्ममध्ये शेतीशी निगडित विविध प्रयोग केले जातात. येथे सुरू असलेला गांडूळ खत प्रकल्प पाहण्यासाठी शालेय आणि महाविद्यालयीन मुलं येतात. काही शाळा तर येथे शैक्षणिक सहलही काढतात.
नेमकं या सहली येथे आल्यानंतर येथे आलेल्या मुला-मुलींना हे प्रकार खूपच भयावह वाटतात. शासकीय जागेचा होणारा गैरवापर थांबविण्याची मागणी होत असल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले होते.
त्याचे कारणही तसेच आहे. दुपारी एकनंतर या परिसरात मद्यपींचा अड्डा जमतो. तीन-चारजणांचे टोळके गाड्यांवरून बाटल्या घेऊनच फार्ममध्ये एन्ट्री करते. त्यानंतर झाडाच्या सावलीखाली त्यांचा डाव रंगतो.
कागदातून बांधून आणलेला चकणा खात-खात, एक-एक घोट थेट बाटलीनेच मद्यप्राशन सुरू असते. मोठ्या आवाजातील गप्पा आणि सोबतीला उडत्या चालीची गाणी यामुळे त्यांना बारमध्येच बसल्याचा जणू आनंद मिळतो. शेतीफार्ममध्ये काही कामानिमित्ताने येणाऱ्यांना हा नजारा आता नित्याचाच बनला आहे.