प्रतापसिंह उद्यानामुळे साताऱ्याच्या लौकिकात भर
By admin | Published: October 6, 2016 11:34 PM2016-10-06T23:34:18+5:302016-10-07T00:14:45+5:30
उदयनराजे : यादोगोपाळ पेठेत उद्यानाचे भूमिपूजन; ‘नाईन-डी शो’ पाहण्याची सुविधा, चिमुकल्यांसाठी पर्वणी
सातारा : ‘नगरसेविका दीपाली गोडसे यांच्या पाठपुराव्यामुळे सत्यात उतर असलेले यादोगोपाळ पेठेतील दिवंगत प्रतापसिंह महाराज ऊर्फ दादा महाराज उद्यान साताऱ्याच्या लौकिकात भर घालेल,’ असा विश्वास खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.
यादोगोपाळ पेठेत, तालिमखान्यासमोर पालिकेच्या वतीने प्रतापसिंह महाराज ऊर्फ दादा महाराज उद्यान उभारण्यात येत आहे. त्याचे भूमिपूजन ‘नक्षत्र’च्या संस्थापिका दमयंतीराजे भोसले यांच्या हस्ते झाले. त्यावेळी खासदार उदयनराजे बोलत होते. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, नगराध्यक्ष विजय बडेकर, उपनगराध्यक्ष जयवंत भोसले, नगरसेविका दीपाली गोडसे आदी उपस्थित होते.
उदयनराजे म्हणाले, ‘अनेक वर्षांपासून या ठिकाणी उद्यानासाठी आरक्षित जागा विकासाविना पडून होती. दीपाली गोडसे यांनी लक्ष घालून पाठपुरावा सुरू केला. त्याला यशही आले. त्यांच्यामुळेच आज या ठिकाणी बगिचाचा विकास होत आहे. एखाद्या कामाचा किती पाठपुरावा करावा, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणून गोडसे यांच्याकडे पाहता येईल. ‘नाईन-डी शो’ पाहण्याची सुविधा या उद्यानामुळे सातारा शहरच नव्हे तर जिल्हावासीयांना उपलब्ध होणार आहे. मुंबईतील तारांगणच्या धर्तीवर छोटेखानी तारांगण, खुला रंगमंच, सायकल ट्रॅक, मुलांसाठी खेळणी अशी विरंगुळ्याची बरीच साधने सातारकरांसाठी उपलब्ध होणार आहेत.’
दमयंतीराजे म्हणाल्या, ‘घरात लहान मुलांना आपण जास्त टीव्ही पाहू नकोस, सारखा मोबाईलवर खेळू नकोस अशा सूचना करत असतो. परंतु मुलांना करमणुकीसाठी चांगले पर्याय आपण देत नाही. सातारकरांची ही गरज ओळखून दीपाली गोडसे यांनी एका चांगल्या उद्यानाच्या निर्मितीचे काम हाती घेतले आहे.’
दीपाली गोडसे म्हणाल्या, ‘खासदार उदयनराजे व आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या खंबीर पाठबळामुळेच आपण उद्यानाच्या उभारणीसाठी पुढाकार घेतला. जागा ताब्यात घेण्यापासून निधीच्या मंजुरीपर्यंत अनेक तांत्रिक अडथळे आले. मात्र, इच्छा असली की मार्ग निघतो. या उक्तीप्रमाणे हे अडथळेही बाजूला होत गेले. (प्रतिनिधी)