प्रवीण जाधवच्या प्रयत्नांचे कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:41 AM2021-07-30T04:41:23+5:302021-07-30T04:41:23+5:30

फलटण तिरंदाजीच्या पुरुष एकरी स्पर्धेत महाराष्ट्राच्या प्रवीण जाधवने पहिल्याच सामन्यात विजय मिळवत दुसरी फेरी गाठली. मात्र दुसऱ्या फेरीत त्याला ...

Praveen Jadhav's efforts appreciated | प्रवीण जाधवच्या प्रयत्नांचे कौतुक

प्रवीण जाधवच्या प्रयत्नांचे कौतुक

Next

फलटण

तिरंदाजीच्या पुरुष एकरी स्पर्धेत महाराष्ट्राच्या प्रवीण जाधवने पहिल्याच सामन्यात विजय मिळवत दुसरी फेरी गाठली. मात्र दुसऱ्या फेरीत त्याला जगातील नंबर १ च्या ब्राडीने त्याला पराभूत केले असले तरी अत्यंत गरीब कुटुंबातून वर आलेल्या झुंजार प्रवीणचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पुरुष एकेरीत खेळणारा महाराष्ट्राचा सुपुत्र तिरंदाज प्रवीण जाधव याने चांगली सुरुवात करत पहिला सामना ६-० च्या फरकाने जिंकला. त्याने जगातील नंबर २ चा खेळाडू असणाऱ्या आरओसी संघाच्या गालसन बाजारझापोव याला मात देत दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला होता. त्यामुळे तो पदक जिंकेल याची आशा सर्वांना लागून राहिली होती. अनेकजण प्रवीणने पदक जिंकावे म्हणून देवाचा धावा करत होते. फलटण तालुक्यातील प्रत्येकाला प्रवीण पदक जिंकेल याची खात्री वाटत होती. काही जण तर पदक जिंकल्यास त्याची जंगी मिरवणूक काढण्याचे प्लॅनिंग करत होते.

शेतमजुराचा मुलगा असलेला प्रवीण गरिबीचे चटके सहन करत अपुऱ्या साधनसामग्रीवर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पात्र ठरला होता. फलटण तालुक्यातून प्रथमच ऑलिम्पिकमध्ये जाणारा तो पहिला खेळाडू ठरला होता. त्यामुळे त्याची पदक जिंकण्याची आशा कायम होती. पहिला सामना सहज जिंकल्याने त्याने आशा निर्माण केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या फेरीत मात्र जगातील नंबर एकचा तिरंदाज असणाऱ्या अमेरिकेच्या एलिसन ब्राडीने जाधवला नमवत स्पर्धेबाहेर केले.

पहिल्या सेटपासूनच ब्राडीने सामन्यात दबदबा कायम ठेवला होता. पहिल्या सेटमध्ये ब्राडीने २८ गुण मिळवले. तर जाधव २७ गुण मिळवल्याने पिछाडीवर पडला. ज्यामुळे सामन्यात ब्राडीने २-० ची आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये ब्राडीने २७ गुण मिळवले तर जाधव २६ गुणच मिळवू शकला. त्यानंतर अखेरच्या निर्णायक सेटमध्ये ब्राडीने २६ आणि जाधवने २३ गुण मिळवल्याने अखेर सामन्यात जाधव ६-० ने पराभूत झाला. या पराभावासह जाधवची यंदाच्या ऑलिम्पिकमधील यात्राही संपली आहे. मात्र, प्रवीणने सर्वांची मने जिंकली असून या अनुभवातून तो पुढच्या ऑलिम्पिकमध्ये निश्चितच पदक जिंकेल, असा आत्मविश्वास व्यक्त होत आहे.

चौकट

पहिल्यांदा ऑलिम्पिक खेळायला प्रवीण गेला होता. त्याच्या पुढे मोठे आव्हान असतानाही त्याने आपला खेळ उंचावत चांगले प्रदर्शन केले. माझ्याकडे टीव्ही नसल्याने मला सामना बघता आला नाही. मात्र, काही लोकांनी तो हरल्याचे सांगितल्यावर थोडे वाईट वाटले. मात्र, पहिल्याच ऑलिम्पिकचा अनुभव प्रवीणला पुढच्या ऑलिम्पिकसाठी फायदेशीर ठरेल. तो पुढच्यावेळी पदक निश्चितच मिळवेल देशाचे नाव उंचावेल

रमेश जाधव, प्रवीणचे वडील

Web Title: Praveen Jadhav's efforts appreciated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.