प्रवीण जाधवच्या कुटुंबाला मदत करणार - उबाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:24 AM2021-06-30T04:24:58+5:302021-06-30T04:24:58+5:30
फलटण : ‘ऑलिम्पिक खेळाडू प्रवीण जाधवचे जीवन संघर्षमय आहे. त्याने खेळासाठी घेतलेले कष्ट व चिकाटी पाहून तो आपल्या देशाचे ...
फलटण : ‘ऑलिम्पिक खेळाडू प्रवीण जाधवचे जीवन संघर्षमय आहे. त्याने खेळासाठी घेतलेले कष्ट व चिकाटी पाहून तो आपल्या देशाचे नाव उज्ज्वल केल्याशिवाय राहणार नाही. प्रवीण व त्याच्या कुटुंबाला बहुजन कल्याण विभाग व सामाजिक न्याय खाते सर्वोतोपरी मदत करेल,’ अशी ग्वाही सहायक समाज कल्याण आयुक्त नितीन उबाळे यांनी दिली.
ऑलिम्पिकमध्ये धनुर्विद्या क्रीडा प्रकारात सरडे ता. फलटण येथील प्रवीण रमेश जाधव यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्या कुटुंबाची उबाळे यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी ते बोलत होते.
उबाळे म्हणाले, ‘‘प्रवीण जाधवने बालवयापासूनच आपले जीवन खेळासाठी अर्पण केले आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थिती त्याच्या आईवडिलांनी प्रवीणला पाठबळ दिले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी व खेळाडूंना सुविधांचा अभाव असला तरी सरडे गावात अनेक खेळाडू तयार होत आहेत, ही समाधानाची बाब आहे. प्रवीण निश्चितच देशासाठी पदक जिंकेल.’
प्रवीणचे वडील रमेश जाधव व आई संगीता जाधव यांचा सत्कार उबाळे यांच्या हस्ते करण्यात आला. सरडे गावातील विविध क्रीडा प्रकारात देशासाठी खेळणाऱ्या खेळाडूंशी त्यांनी संवाद साधला. याप्रसंगी माजी सरपंच दत्ता भोसले, रामदास शेंडगे, संजय जाधव, आप्पासाहेब वाघमोडे, भालचंद्र जाधव, आण्णा भंडलकर, सर्जेराव बेलदार, ग्रहपाल कांबळे ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो २९प्रवीण जाधव
सरडे येथे खेळाडू प्रवीण जाधव यांच्या आई-वडिलांच्या सहायक समाज कल्याण आयुक्त नितीन उबाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. (छाया : नसीर शिकलगार)