काले येथे कोरोनाच्या दुसऱ्या लसीला प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:24 AM2021-07-22T04:24:04+5:302021-07-22T04:24:04+5:30
कऱ्हाड : काले (ता. कऱ्हाड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे कोरोनाच्या दुसऱ्या लसीला प्राधान्य देण्यात आले आहे. आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या ...
कऱ्हाड : काले (ता. कऱ्हाड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे कोरोनाच्या दुसऱ्या लसीला प्राधान्य देण्यात आले आहे. आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमधील ग्रामस्थांना दुसरी लस देण्याची मोहीम आठ दिवसांत पूर्ण केली जाणार आहे. आरोग्य केंद्रांतर्गत १६ गावे आहेत. मार्च महिन्यापासून याठिकाणी लसीकरण सुरू आहे. अनेक ग्रामस्थांनी पहिली लस घेतली आहे. दुसरी लस काही दिवसात मिळणार होती. दोन्ही लसीमधील ८४ दिवसांचे अंतर पूर्ण झाले आहे. त्यामुळे दुसरी लस देण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रांगणात लस घेणाऱ्यांची होणारी गर्दी विचारात घेऊन गावोगावी लसीचे वाटप सुरू आहे.
अवैध व्यवसायांवर कारवाईची मागणी
कऱ्हाड : तालुक्याच्या उत्तर भागात अवैध मटका जोरात सुरू आहे. उंब्रज, मसूर, चाफळ, तारळे यासह पाटण तालुक्यातील दुर्गम भागातील काही गावांचा त्यामध्ये समावेश असून, बेकायदा व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी लोकशक्ती प्रतिष्ठानतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मटक्याचा व्यवसाय छुप्या पद्धतीने सुरू आहे. त्यावर पोलिसांचा वचक नाही. अवैध मटका घेणारा मोबाईलवरून आकडे घेतो आहे. मोबाईलद्वारे अड्डे चालविले जात असून, त्यावर कारवाईची मागणी निवेदनाद्वारे संघटनेने केली आहे.
सेवानिवृत्तीनिमित्त विंगला प्रकाश साठे यांचा सत्कार
कऱ्हाड : विंग (ता. कऱ्हाड) येथील आदर्श विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक प्रकाश साठे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. संस्थेचे माजी अर्थ सहसचिव एस. के. कुंभार, माजी सहसचिव आर. के. भोसले यांच्या हस्ते सत्कार समारंभ पार पडला. मुख्याध्यापक विश्वास मोरे, आजीव सेवक के. जे. ढवळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नीळकंठ खबाले, एस. के. ढवळे, भास्करराव थोरात, यू. एस. गलांडे, एस. एन. जाधव, बी. बी. कुंभार, एस. एम. सादळे, एस. एस. खेडकर, जे. एम. पाटील यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यु. एस. गलांडे यांनी सूत्रसंचालन केले तर मनीषा पाटील यांनी आभार मानले.