बिले वसूल करण्यापेक्षा कामांना प्राधान्य द्या!

By admin | Published: November 11, 2016 10:37 PM2016-11-11T22:37:39+5:302016-11-11T22:37:39+5:30

कऱ्हाडात सभा : सभापतींचे ‘वीजवितरण’च्या अधिकाऱ्यांवर ताशेरे

Prefer work rather than recovering bills! | बिले वसूल करण्यापेक्षा कामांना प्राधान्य द्या!

बिले वसूल करण्यापेक्षा कामांना प्राधान्य द्या!

Next

कऱ्हाड : ‘वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रश्नाचे गांभीर्य नसते. पंचायत समिती सदस्य हा त्यांच्या विभागातील बारा-पंधरा हजार मतदारांचे प्रतिनिधीत्व करीत असतो. त्यामुळे सदस्यांना लोकांच्या प्रश्नांना उत्तरेही द्यावीच लागतात. अधिकाऱ्यांनी केवळ बिल वसुलीच्या कामास प्राधान्य देण्यासोबत जनतेच्या निगडीत प्रलंबित कामांनाही प्राधान्य द्या,’ अशा शब्दात सभापती देवराज पाटील यांनी वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना खडसावले.
कऱ्हाड पंचायत समितीची मासिक सभा पंचायत समितीच्या सभागृहात पार पडली. यावेळी सभेस गटविकास अधिकारी अविनाश फडतरे, सहायक गटविकास अधिकारी मधुकर देशमुख उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीला सदस्या अश्विनी लवटे यांनी मुंढे येथील डीपी बदलण्याचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला. गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रश्न प्रलंबित असल्याबद्दल वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्यांनी धारेवर धरले. अधिकाऱ्यांकडून महिला सदस्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा आरोपही यावेळी लवटे यांनी केला. वीज कंपनीकडून मुंढे गावातच बेकायदेशीरपणे बांधकामास कनेक्शन देण्यात आले आहे, अशी माहिती सदस्या लवटे यांनी सभागृहास दिली. याबाबत जर ग्रामपंचायतीची हरकत नसेल तर कनेक्शन कसे देण्यात आले, याबाबत खुलासा करण्याची सूचना सभापतींनी केली. वीजमीटरचे रिडींग योग्य प्रकारे घेतले जात नसल्यामुळे ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिले येत असल्याचा आरोप अनिता निकम यांनी यावेळी केला. यावर लवकरच मीटरचे
रिडींग मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची
माहिती वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
कृषी विभागाकडे विविध औजारांसाठी अनुदान उपलब्ध आहे.परंतु त्यासाठी विहित मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. अनिता निकम यांनी एसटी महामंडळाच्या कारभारावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली. कऱ्हाड आगाराच्या बसेस सेवारस्त्यांवरून न नेता महामार्गांवरूनच नेण्यात येत असल्यामुळे प्रवासी, नोकरदार तसेच विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असल्याचे निकम यांनी सांगितले.
गेल्या काही महिन्यांपासून सुरू असणारी कऱ्हाड-म्होप्रे बस बंद करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत. ही बस बंद करून फक्त भोळेवाडीसाठी बससेवा सुरू करण्याचे कारण काय, असा प्रश्न सदस्य लक्ष्मण जाधव यांनी उपस्थित केला. म्होप्रेसाठी पुन्हा बससेवा सुरू न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला. तलाठी-ग्रामसेवकांच्या आंदोलनामुळे जनतेचे हाल होत असल्यामुळे त्यांच्या मागण्या मान्य करण्याबाबत पाठपुरावा करण्याची मागणी रुपाली यादव यांनी केली. (प्रतिनिधी)
तालुक्यात २२६ गावांत ‘मागेल त्याला शेततळे’
मागेल त्याला शेततळे’ ही योजना कऱ्हाड तालुक्यातील २२६ गावांमध्ये राबवली जाणार आहे. यासाठी आॅनलाईन पद्धतीने प्रस्ताव मागवण्यात येणार आहेत. तालुका कृषी अधिकारी खरात यांनी कृषी विभागाचा आढावा सादर करताना माहिती दिली.

Web Title: Prefer work rather than recovering bills!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.