गरोदर महिलांनाही आता घेता येणार कोरोना प्रतिबंधक लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:26 AM2021-07-08T04:26:05+5:302021-07-08T04:26:05+5:30
डॉक्टरांचा सल्ला लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात कोरोनाच्या शिरकावानंतर नागरिकांनी लसीकरणाला प्रतिसाद दिला आहे. सध्या १८ वर्षांवरील युवकांचेही ...
डॉक्टरांचा सल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात कोरोनाच्या शिरकावानंतर नागरिकांनी लसीकरणाला प्रतिसाद दिला आहे. सध्या १८ वर्षांवरील युवकांचेही लसीकरण करण्यात येत आहे. मात्र गेल्या सात महिन्यांपासून गरोदर महिलांना लसीकरण करण्याचे ठरले नव्हते; मात्र शासनाने आता गरोदर मातांनाही कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र लस घेण्यापूर्वी गरोदर महिलांनी आपल्याला कोणती ॲलर्जी आहे याची शहानिशा करूनच लस घ्यावी, असा सल्ला वैद्यकीय अधिकारी देत आहेत.
जिल्ह्यात सध्या लसीकरणाने चांगलाच वेग घेतला आहे. त्यातच अधूनमधून लसीकरण बंद पडत आहे. त्याचे कारण म्हणजे लसीचा होणारा तुटवडा. मात्र आता गरोदर महिलांनाही लस देण्याचा निर्णय झाल्याने शासनाला लसीचा अधिकच पुरवठा करावा लागणार आहे. गरोदर मातांनी लस घ्यावी का न घ्यावी असा संभ्रम होता. मात्र काही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गरोदर मातांनी लस घेण्यापूर्वी काही खबरदारी घेतली तर त्याचे दुष्परिणाम होणार नाहीत, असा सल्ला दिला आहे. लस घेतल्यानंतर पोटातील बाळाला त्यापासून कसलाही धोका नसल्याचेही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये सध्या ८०० महिला महिन्याकाठी प्रसूतीसाठी येत आहेत. या महिलांचेही आता प्रशासनाला लसीकरण करावे लागणार आहे. तसेच काही महिलांना रुग्णालयात जाता येणार नाही अशा महिलांसाठी घरोघरी जाऊन लस दिली जावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे.
चौकट
गरोदर महिलांनी लस घेण्यापूर्वी काय काळजी घ्यावी
गरोदर मातांनी कोरोना प्रतिबंधक लस घेण्यापूर्वी काही महत्त्वाची माहिती त्यांना असणे गरजेचे आहे. अनेक महिलांना वेगवेगळ्या प्रकारची ॲलर्जी असते कोणाला अंड्याची, तर कोणाला धुळीची ॲलर्जी असते अशा प्रकारची जर ॲलर्जी असेल तर कोविशिल्ड लस घेऊ नका. त्याऐवजी कोव्हॅक्सिन ही लस घ्यावी, असा सल्ला वैद्यकीय अधिकारी देत आहेत.
लस घेण्यापूर्वी उपाशीपोटी जाऊ नये तसेच या काळात उपवास करू नयेत. सकस आहार घेणे गरजेचे आहे. तसेच लसीकरण केंद्रावर मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग नियमाचेही पालन करावे. गर्दीमध्ये जाणे टाळावे, अशा प्रकारची काळजी गरोदर महिलांनी घेणे गरजेचे आहे.
कोट
गरोदर मातांनी लसीकरण केंद्रावर जाताना प्रचंड खबरदारी घेणे गरजेचे आहे. तोंडाला मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवणे गरजेचे आहे. तसेच लस घेण्यापूर्वी आणि नंतरही या महिलांनी सकस आहार घ्यावा. वारंवार तपासण्या करून घ्याव्यात. महिलांनी आपल्या स्वतःला कशाची ॲलर्जी आहे हे तपासावे.
डॉ. सुधीर कदम, स्त्रीरोग तज्ज्ञ
कोट
गरोदर मातांना लस देण्यासाठी स्वतंत्र केंद्र तयार करण्यात येणार असून, या ठिकाणी या मातांना लस दिली जाणार आहे. तसेच ग्रामीण भागातील ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना गावोगावी जाऊन कॅम्प घेण्यास सांगण्यात आले आहे, त्या ठिकाणीही या गरोदर मातांना लस दिली जाणार आहे.
डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, सातारा