फलटणमधील शेतकऱ्यांवर ‘अवकाळी’ची अवकळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:40 AM2021-01-13T05:40:11+5:302021-01-13T05:40:11+5:30

फलटण : अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे शेतकरी, साखर कारखानदार, वीटभट्टी चालक यांचे व्यवसाय संकटात सापडले आहेत. या क्षेत्रातील ...

'Premature' discrimination against farmers in Phaltan! | फलटणमधील शेतकऱ्यांवर ‘अवकाळी’ची अवकळा !

फलटणमधील शेतकऱ्यांवर ‘अवकाळी’ची अवकळा !

Next

फलटण : अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे शेतकरी, साखर कारखानदार, वीटभट्टी चालक यांचे व्यवसाय संकटात सापडले आहेत. या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे रोजगार बुडाल्याने त्यांच्यासमोर उपासमारीचे संकट उभे आहे. तर साखर कारखान्यातील तोडणी वाहतूक मजुरांच्या तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आलेल्या निवाऱ्यात पाणी शिरल्याने त्यांच्यावर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे.

फलटण तालुक्यातील शेतकरी अवकाळी पावसामुळे अडचणीत आला आहे. या पावसामुळे शेतातील रब्बीच्या उभ्या पिकांवर करपा, तांबेरा, कीडरोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कृषी खात्याने पिकांवरील संभाव्य कीडरोग, करपा, तांबेरा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी औषध फवारणीचा सल्ला दिला असला तरी पैशाशिवाय औषधे कोठून व कशी आणणार? या विवंचनेत शेतकरी चिंतातूर झाला आहे.

अवकाळीचा वीट व्यावसायिकांनादेखील फटका बसला. काम बंद झाल्याने वीट भट्टीवर काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ तर आली शिवाय त्यांचा तात्पुरता निवारा संपुष्टात आल्याने ही कुटुंबे उघड्यावर आली आहेत. साखर कारखान्यांत ऊस तोडणीसाठी आलेल्या मजुरांनादेखील अवकाळी पावसामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी हतबल झाले आहेत. बँका, दुकानदार, सावकार यांच्याकडून गरजेपुरता पैसा घेतला. मात्र, तो परत न करता आल्याने शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना शासनाच्या ठोस मदतीची गरज निर्माण झाली आहे.

(चौकट)

भरपाईची मागणी

यावर्षी रब्बी हंगाम यशस्वी झाल्याने बळीराजा सुखावला असताना अवकाळीने तडाखा दिल्याने आता शेतकरी पुन्हा एकदा कोलमडून पडला आहे. त्यांना उभारी देण्यासाठी शासनाने गत हंगामात अतिवृष्टीने वाया गेलेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याबाबत केलेल्या घोषणेची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

फोटो : ११ फलटण

फलटण तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे वीटभट्टी व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. (छाया : नसीर शिकलगार)

Web Title: 'Premature' discrimination against farmers in Phaltan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.