अवकाळीने वीटभट्टी व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:31 AM2021-01-09T04:31:50+5:302021-01-09T04:31:50+5:30
मायणी : मागील तीन ते चार दिवसांपासून खटाव तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे वीटभट्टी व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान ...
मायणी : मागील तीन ते चार दिवसांपासून खटाव तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे वीटभट्टी व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
कुंभार समाजाचा मुख्य व्यवसाय असलेला माती वीटभट्टी उद्योग हा दरवर्षी दीपावलीनंतर साधारण डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला सुरू होतो. या वर्षी कोरोना विषाणूचा प्रभाव असल्याने वीटभट्टीसाठी येणारे मजूर थोडे उशिरा आल्याने वीटभट्टी हंगाम थोडा उशिरा सुरू झाला.
त्यामुळे अनेक वीटभट्टी व्यावसायिकांनी गेल्या आठ-दहा दिवसांपासून या वर्षीचा वीटभट्टी हंगाम सुरू केला. त्यामुळे बहुतांश वीटभट्टीचा ठिकाणी या कच्च्या मातीच्या विटा तयार करण्याचे काम सुरू आहे. हिवाळ्याचा हंगाम व कडक ऊन नसल्याने कच्ची वीट वाळण्यासाठी थोडा उशीर होत आहे. कच्ची वीट वाळावी म्हणून ती पसरून ठेवली जाते किंवा उभी करून ठेवली जात आहे.
त्यातच गेल्या चार-पाच दिवसांपासून परिसरामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. तसेच रात्रीच्या वेळी अवकाळी पाऊस येत असल्याने नुकत्याच तयार केलेल्या मातीच्या विटा पूर्ण भिजत आहेत. त्यामुळे तयार केलेल्या कच्च्या वीट पुन्हा मातीमध्ये मिसळाव्या लागत असल्याने या अवकाळी पावसामुळे वीटभट्टी व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.
कोट..
तयार केलेली कच्ची वीट पूर्ण सुकल्यानंतर ती उभी करून ठेवली जाते. उउभ्या केलेल्या विटा आठ ते दहा दिवस पूर्ण खडखडीत सुकल्यानंतर त्यांची भट्टी रचली जाते. साधारण निम्म्याहून अधिक भट्टी रचून झाल्यावर ती योग्य पद्धतीने पेटवली जाते. ही प्रक्रिया साधारण १० ते १५ दिवसांपर्यंत सुरू असते.
- नितीन कुंभार, वडूज
०८ मायणी विटा
खटाव तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून निर्माण होणारे ढगाळ वातावरण व रात्रीच्या वेळी पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे कच्च्या विटा अशा पद्धतीने झाकून ठेवाव्या लागत आहेत. (छाया : संदीप कुंभार)