कंपनीच्या आवारात बिबट्याची ‘एंट्री’ : धावपळीत एकजण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 07:37 PM2019-02-02T19:37:46+5:302019-02-02T19:40:17+5:30
मलकापूर : कंपनीच्या आवारात बिबट्याला बघून सुरक्षारक्षकांची पळता भुई थोडी झाली. समोर बिबट्या दिसताच पळणारा सुरक्षारक्षक काही अंतरावर पडल्याने ...
मलकापूर : कंपनीच्या आवारात बिबट्याला बघून सुरक्षारक्षकांची पळता भुई थोडी झाली. समोर बिबट्या दिसताच पळणारा सुरक्षारक्षक काही अंतरावर पडल्याने तो जखमी झाला. यावेळी आरडाओरडा झाल्यामुळे बिबट्याने संरक्षक भिंतीवरून उडी मारत डोंगराच्या दिशेने पलायन केले. आगाशिवनगर येथील एका नामांकित कंपनीत शुक्रवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
आगाशिवनगर येथे कºहाड-ढेबेवाडी रस्त्यालगत एक नामांकित कंपनी आहे. शुक्रवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास कंपनीचा सुरक्षा रक्षक गस्त घालत होता. अचानक त्याला समोर बिबट्या दिसला. पथदिव्यांच्या उजेडात बिबट्या स्पष्ट दिसल्याने सुरक्षारक्षकाची घाबरगुंडी उडाली. तो जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा करत पळत सुटला. काही अंतरावर तो पाय घसरून पडल्याने किरकोळ जखमी झाला. आरडाओरडा ऐकून इतर सुरक्षारक्षकही एकत्र आले. त्यांनी तातडीने वनपाल रमेश जाधवर यांच्याशी संपर्क केला. कंपनीच्या आवारात बिबट्या बघितला असल्याचे त्यांनी सांगितले.
वनपाल जाधवर यांच्यासह कर्मचारी तातडीने कंपनीत दाखल झाले. कंपनीच्या सुरक्षारक्षकांसोबत परिसरात शोधाशोध केली. मात्र बिबट्या आढळून आला नाही. कंपनीत शोधाशोध सुरू होती त्याचवेळी दांगट वस्तीच्या बाजूने कुत्री भुंकत असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून दांगट वस्तीच्या बाजूला कमी उंचीच्या भिंतीवरून उडी मारून बिबट्याने पुन्हा आगाशिव डोंगराच्या दिशेने धूम ठोकली असावी, असा अंदाज वन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. हा प्रकार समजताच आगाशिव डोंगराच्या पायथ्याला असलेल्या झोपडपट्टी परिसरात खळबळ उडाली आहे.
भरवस्तीत बिबट्याचा वावर झाला हे समजताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. आगाशिव डोंगराच्या पायथ्याला मोठी वस्ती आहे. झोपडपट्टी परिसरात तर अनेक नागरिक बाहेरच झोपलेले असतात. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
बिबट्याच्या भीतीने कंपनीला सुटी
आगाशिवनगर येथील कंपनीच्या आवारात रात्रीच्यावेळी बिबट्या आल्याचे संबंधित कंपनीच्या सुरक्षारक्षकाने पाहीले. कंपनीत सुमारे दीडशे कर्मचारी काम करतात. कंपनीच्या परिसरात असलेली झाडी व मोठ्या इमारती विचारात घेता बिबट्याला लपण्यासाठी भरपूर जागा आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये व खबरदारीचा उपाय म्हणून शनिवारी कंपनी बंद ठेवली असल्याची परिसरात चर्चा आहे.
शनिवारीही दोन तास शोध मोहीम
आगाशिवनगर परिसरातील कंपनीच्या सुरक्षारक्षकाने बिबट्या पाहिला असल्याची खबर वनविभागाला दिली. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत शोधूनही काही सापडले नाही. मात्र, शनिवारी सकाळी पुन्हा कंपनी प्रशासनाचा वनपाल जाधवर यांना फोन आला. सकाळी साडेसात वाजल्यापासून दोन तास कंपनीचा परिसर पिंजून काढला. मात्र बिबट्या आढळला नाही, अशी माहिती वनपाल जाधवर यांनी दाली.