शरद पवारांविरोधात आंदोलनाची तयारी
By admin | Published: September 6, 2016 01:37 AM2016-09-06T01:37:34+5:302016-09-06T01:39:51+5:30
अॅट्रॉसिटी प्रतिक्रिया : आंबेडकरप्रमी कार्यकर्त्यांकडून निषेधाचे पत्रक
सातारा : शाहू, फुले आणि आंबेडकर विचारांचा वारसा लाभलेल्या पुरोगामी महाराष्ट्रात काही अपवाद वगळता मराठा आणि मागासवर्गीय समाज गुण्या-गोविंदाने राहत आहेत, ज्या-ज्यावेळी महाराष्ट्रात मागासवर्गीयांवर आणि संबंधित महिलांवर अत्याचाराच्या भीषण घटना घडल्या त्यावेळी शरद पवार यांनी त्यांच्याप्रती कधी सांत्वन अथवा आधार देण्याचे काम केले नाही. किंवा अॅट्रॉसिटी कायदा कडक करावा म्हणून मागणी केली नाही, असा आरोप रिपब्लिकन पक्षाचे संजय गाडे यांनी एका पत्रकाद्वारे केला आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की, केवळ कोपर्डी प्रकरणात राजकीय हित साधण्यासाठी बीड आणि उस्मानाबाद येथे सुनियोजित निषेध आंदोलनाचा विराट मोर्चा काढून समाजाला मागासवर्गीय समाजावर हिंसक होण्यास भाग पाडत आहे. केवळ रामदास आठवले यांच्या भाजप युतीच्या भूमिकेमुळेच महाराष्ट्रातील सत्ता हातातून निघून गेल्याने हताश झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जातीय तेढ निर्माण व्हावी, राज्यात अशांतता निर्माण व्हावी आणि पुन्हा एकदा सत्तेचे झुकते माप आपल्याला मिळावे, या हेतूने प्रेरित होऊन अॅट्रॉसिटी कायद्याबाबत वक्तव्य करून राज्यात जात-धर्मातील एकसंधतेला छेद देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
महापुरुषांचा वारसा लाभलेल्या राज्यात केवळ सत्तेपोटी अशी दोन जातीत तेढ निर्माण करणारी वक्तव्य शरद पावर यांना शोभणारी नाही आणि राज्यात गुण्या-गोविंदाने राहणाऱ्या सर्वांनाच अनुकूल नाही. याचा गांभीर्याने विचार करून श्रमिक ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दादा ओव्हाळ, विजय गायकवाड, मदन खंकाळ यांच्यासह रिपाइं कार्यकर्ते दि. ९ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालय समोर एल्गार आंदोलन करून शरद पवार यांचा निषेध करणार असल्याचे गाडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
तेढ निर्माण करण्याचे पवारांचे निंदनीय काम
राजकारणातील धुरंधर म्हणून ओळख असणाऱ्या पवार यांना आठवले भाजप, सेना व इतर मित्र पक्षांशी युती केल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली. कायम सत्तेत राहण्याची सवय झालेल्या पवार यांना ही बाब रुचलेली नाही. भविष्यात असाच फॉर्म्युला राहिल्यास सत्तेचे फळ चाखता येणार नाही. याची खात्री झाल्यानेच तेढ निर्माण कसे होईल, त्यासाठी पवार यांनी चालवलेला प्रयत्न निंदनीय आहे, असेही पत्रकात म्हटले आहे.