जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्याची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:39 AM2021-04-25T04:39:18+5:302021-04-25T04:39:18+5:30
सातारा : जिल्ह्यातील रुग्णालयामध्ये ऑक्सिजनची कमतरता भासू नये, या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाचे पूर्णपणे नियोजन सुरू आहे. कऱ्हाड, फलटण, कोरेगाव, ...
सातारा : जिल्ह्यातील रुग्णालयामध्ये ऑक्सिजनची कमतरता भासू नये, या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाचे पूर्णपणे नियोजन सुरू आहे. कऱ्हाड, फलटण, कोरेगाव, काशीळ येथे १२५ जम्बो सिलिंडर प्लांट उभे केले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शनिवारी दिली.
जिल्हाधिकारी म्हणाले की, संपूर्ण राज्यामध्ये ऑक्सिजन पुरवठा यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. या परिस्थितीमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या गंभीर रुग्णांना ऑक्सिजन कमी पडणार नाही, यासाठी आम्ही काळजीपूर्वक नियोजन करीत आहोत. काही ग्रामीण हॉस्पिटलमध्येही जंबो सिलिंडर भरण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री शंभुराजे देसाई यांच्यासह जिल्ह्यातील पूर्ण प्रशासकीय टीम मिळून एकत्रित काम करीत आहोत. सर्वच रुग्णालयांना ऑक्सिजन मॉनिटरी कमिटीच्या माध्यमातून सिस्टीम ऑडिट करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. रुग्णालयामध्ये ऑक्सिजन गळती होते का, याबाबतही तपासणी करण्याच्या सूचना केले आहेत. तसेच हायपर निजल ऑक्सिजन ज्या रुग्णांना अत्यावश्यक असल्यासच तो द्यावा; कारण नेहमीच्या वापराच्या कितीतरी पट जादा ऑक्सिजन अशा वेळी खर्च होत असतो.
दरम्यान, प्रशासकीय यंत्रणा परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रत्येक मिनिट प्रयत्न करीत आहे; त्यामुळे जिल्ह्यातील जनतेने गोंधळून न जाता डॉक्टरांनी केलेल्या उपचारांवर विश्वास ठेवावा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच उपचार घ्यावेत, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.