अपात्र आमदारांच्या कारवाईची पूर्वतयारी म्हणजेच ‘हा’ शपथविधी : पृथ्वीराज चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 12:08 PM2023-07-03T12:08:12+5:302023-07-03T12:09:09+5:30
राज्यात ‘मिनिस्टर लाँड्रिंग’ची स्थिती; मोदी सत्तेसाठी कोणत्याही थराला जातील
कऱ्हाड (जि. सातारा) : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सध्या लोकसभा महत्त्वाची असल्याने सत्तेसाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. महाविकास आघाडीतून जे गेले ते गेले. मात्र, महाविकास आघाडीची भीती आजही भाजपला असल्याचे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. तसेच अपात्र आमदारांच्या कारवाईची पूर्वतयारी म्हणजे अजित पवारांचा शपथविधी असल्याचे ते म्हणाले.
कऱ्हाड येथे रविवारी पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मला अनेक दिवसांपासून जी शंका होती, ती घटना अखेर आज घडलीच. याचा पहिला अंक आज झाला असून, पुढचे अंक येत्या दोन दिवसांत आपल्याला पाहायला मिळतील. राष्ट्रवादीतील आमदारांवर ईडीची छत्रछाया आहे. अजित पवार, छगन भुजबळ यांच्यासह शिंदे-भाजप गटात गेलेल्यांना चांगली झोप लागावी, यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे.
शिवसेनेत झालेली फूट, या खटल्याचा निकाल सर्वाेच्च न्यायालयाने विधानसभेच्या अध्यक्षांकडे सोपवला आहे. या अपात्रतेचा निकाल ९० दिवसांत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना घ्यावा लागणार आहे. घटनेच्या दहाव्या परिशिष्टानुसार आमदार अपात्र होतील, हे सूर्यप्रकाशाप्रमाणे स्पष्ट आहे. जर अपात्रतेचा निर्णय झाला नाही तर आम्ही सर्वाेच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. अपात्रतेचा निर्णय १० ऑगस्टपर्यंत घ्यावयाचा आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सोळा आमदार अपात्र होणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रिपदही रिक्त होऊ शकते. अपात्र आमदारांवरील कारवाईची पूर्वतयारी म्हणजेच आजचा राजकीय भूकंप आहे.
सत्तेत सहभागी झालेल्या आमदारांना मला एवढेच सांगायचं आहे की, जनतेला गृहीत धरू नका. जनता मूर्ख नाही. कर्नाटकच्या निवडणुकीत काय झाले, हे सर्वांसमोर आहे. महाविकास आघाडी एकत्र असल्यावर भाजपचे काही चालत नाही, हे भाजपला चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळेच राज्यात दीड वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. कोणीतरी गेले म्हणून महाविकास आघाडी फुटली, असे अजिबात म्हणता येणार नाही. आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रच लढणार आहोत. जे गेले ते गेले, आम्ही मात्र विचाराने एकत्र असून जातीवादी पक्षांना रोखण्यासाठी एकजुटीने निवडणुकींना सामोरे जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
घोटाळ्याच्या आरोपांनंतर राष्ट्रवादीत फूट!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्ला चढवत ७० हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप जाहीर सभेत केला होता. त्यानंतर दोनच दिवसांत राष्ट्रवादीतील मोठा गट राष्ट्रवादी सोडून भाजपात सामील झाला. हा मोठा विरोधाभास म्हणायला हवा. सध्या राज्यात ‘मिनिस्टर लाँड्रिंग’ची स्थिती पाहायला मिळत आहे.
तरच त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होईल!
राष्ट्रवादीमधील ५३ आमदारांपैकी दोन तृतीयांश गट बाहेर पडला पाहिजे तरच त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही. यासाठी अजित पवार यांना ३६ आमदारांची गरज आहे. पुढच्या काही दिवसांत ३६ पेक्षा जास्त आमदार त्यांच्याजवळ आहेत की नाही, ते पाहणे महत्त्वाचे आहे. राज्याच्या राजकारणाची अधोगती झाली आहे. पैसा व सत्तेचे राजकारण सध्या भाजपने सुरू केले आहे. त्यामुळे त्यांना जनता माफ करणार नाही, हे कर्नाटक निकालावरून समजून येते.