कृषी प्रदर्शनाची तयारी युद्धपातळीवर
By admin | Published: December 17, 2014 10:07 PM2014-12-17T22:07:51+5:302014-12-17T22:53:35+5:30
पुसेगाव यात्रा : तीनशे स्टॉलस्चा सहभाग
पुसेगाव : श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेनिमित्त राज्यस्तरीय कृषी व पशु-पक्षी प्रदर्शन शुक्रवार, दि. १९ ते दि. २३ या दरम्यान आयोजित केले आहे. या प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या प्रदर्शनात फायबरचे स्टॉल उभारणीचे काम युध्दपातळीवर सुरु आहे.
या प्रदर्शनासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून विविध राज्यातील नामांकित कंपन्यांचे स्टॉल निमंत्रित करण्यात आले आहेत. ३०० स्टॉलची नोंदणीही झाली आहे. प्रदर्शनात शेती संबंधातील कंपन्या, शासकीय योजनासंबंधी माहिती देणाऱ्या स्टॉलचा समावेश आहे.
कृषी व पणन, सहकार, फलोत्पादन, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, डॉ. बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ, नवी दिल्ली, डाळिंंब संशोधन केंद्र सोलापूर, द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे, कांदा व लसूण संशोधन पुणे, वखार महामंडळ, राज्य फलोत्पादन आणि औषधी मंडळ पुणे, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकांचा समावेश असणार आहे. (वार्ताहर)
धान्य महोत्सवाचे आयोजन
कृषी प्रदर्शनात यावर्षी प्रथमच धान्य महोत्सव भरविण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र स्टॉलची उभारणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील दर्जेदार धान्य उत्पादक शेतकऱ्यांनी ट्रस्टच्या कार्यालयाशी संपर्क साधून नोंद करणे गरजेचे आहे. या स्टालसाठी मोफत जागा देण्यात येणार असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे गिड्डे यांनी सांगितले.
जनावरांचे प्रदर्शन
खिल्लार जनावरांसह शेळी, मेंढी, म्हैशी, गायी, श्वान आदी जनावरांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. या प्रदर्शनात सुधारीत जातींच्या म्हैशींची स्पर्धा भरविण्यात येणार आहे. यात मुऱ्हा, पंढरपुरी, सुधारित रेडी व रेडा असे चार गट केले असून विजेत्या मालकांना अनुक्रमे रोख बक्षीस देण्यात येणार असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी सांगितले.