दिल्लीत उदयनराजेंच्या प्रवेशाची तयारी...: मुख्यमंत्र्यांकडून तारखेची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 11:25 PM2019-08-22T23:25:32+5:302019-08-22T23:26:47+5:30
मराठा कार्ड म्हणून अवघ्या महाराष्ट्रात उदयनराजे यांच्या इमेजचा वापर करण्यापर्यंत राष्ट्रवादीने केलेल्या तयारीवर यामुळे पाणी फिरलं असल्याचं मानलं जात आहे.
सातारा : साताऱ्यात शिवेंद्रसिंहराजे यांच्या भाजप प्रवेशापाठोपाठ खासदार उदयनराजेही त्याच मार्गावर जाण्याचं निश्चित करत आहेत. भाजपच्या लाटेत एकटं गलबत कुठवर घेऊन जायचं असं म्हणत तेही हाती कमळ घेण्याच्या निर्णयाप्रत आले आहेत. पक्षप्रवेश झालाच तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या उपस्थितीत दिल्लीतच होणार असल्याची माहिती सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली.
याबाबत माहिती अशी, सत्तेत राहिलो तरच सातारा तालुक्याचा विकास होऊ शकतो, असं कारण पुढं करून जुलै महिन्याच्या शेवटी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या साता-याला मोठा धक्का बसला. पक्षाचे झालेले हे डॅमेज दूर करण्यासाठी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार खुबीने खासदार उदयनराजेंचा वापर करून घेणार, असे कयास बांधले जात असतानाच उदयनराजेंच्या भाजपा प्रवेशाच्या बातम्या धडकू लागल्या आहेत. मराठा कार्ड म्हणून अवघ्या महाराष्ट्रात उदयनराजे यांच्या इमेजचा वापर करण्यापर्यंत राष्ट्रवादीने केलेल्या तयारीवर यामुळे पाणी फिरलं असल्याचं मानलं जात आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर ‘सत्तेत असेल तरच कामं करता येतात, हे आम्हाला समजल्याने कोणत्याही पदाशिवाय केवळ पक्षात येण्यास आणि पुन्हा एकदा लोकसभा लढविण्यास आपण तयार आहोत,’ असं उदयनराजे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. त्यावर मुख्यमंत्री यांनी, ‘आम्हाला तुमच्या सोबत काम करायला आवडेल. आपण राष्ट्रीय नेते आहात, त्यामुळे तुमचा पक्षप्रवेश आपण दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या खास उपस्थितीत करू,’ असे सांगितल्याचे समजते. तर दुसरीकडे पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उदयनराजे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीत पूर्णपणे मोदींच्या विरोधात जिल्हाभर भाषणं दिल्यानंतर आता त्यांना पक्षात घेण्यासाठी मुख्यमंत्री उत्सुक नसल्याचं बोललं जात आहे. ‘राजे मी कायम तुमचं स्वागतच करेन; पण मला वरिष्ठ पातळीवर मान्यता घ्यावी लागेल,’ असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.
साता-याच्या राजकारणात योग्य वेळी योग्य ठिकाणी धक्कातंत्राचा वापर करण्याची उदयनराजेंची स्टाईल आहे. त्याच स्टाईलने भाजपात जाऊ पाहणाºया रामराजे यांना आणि गेलेल्या शिवेंद्रसिंहराजे यांना धक्का देण्यासाठी, अस्वस्थता निर्माण करण्यासाठीही खासदारांनी ठरवून ही भेट घडवून आणली असल्याचंही बोललं जातंय. त्यांचे कार्यकर्ते मात्र पुढच्या आठवड्यापर्यंत ‘वेट अँड वॉच’ म्हणतायत.
जलमंदिरमध्ये आज बैठक...
शिवस्वराज्य यात्रेच्या नियोजनाच्या निमित्ताने गुरुवारी राष्ट्रवादी भवनमध्ये बैठक आयोजित केली होती. या बैठकीला खासदार उदयनराजे भोसले अनुपस्थित होते. दरम्यान, या यात्रेच्या तयारीसाठी जलमंदिरमध्ये शुक्रवारी बैठकीचे आयोजन केले आहे. या यात्रेचे ब्रँड अँबेसिडर खासदार उदयनराजे भोसले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी आहे. उदयनराजे भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त येऊ लागल्याने या बैठकीकडे लक्ष लागले आहे.